19 September 2020

News Flash

औषध दुकानांतही लूट

थर्मल गन, ऑक्सीमीटरच्या किमती दुप्पट

(संग्रहित छायाचित्र)

थर्मल गन, ऑक्सीमीटरच्या किमती दुप्पट

नवी मुंबई : पालिकेने आता रुग्णालयांतील बेसुमार लूटमारीनंतर औषध दुकानांच्या खाबूगिरीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. करोनाकाळात मुखपट्टी, जंतुनाशके, रोगप्रतिकारशक्ती वर्धक औषधे, ऑक्सीमीटर, थर्मल गन, आणि इतर औषधांचा काही औषध दुकानांकडून काळा बाजार करीत एमआरपीच्या रकमेपेक्षा जास्त रक्कम ग्राहकाकडून वसूल केली जात आहे. थर्मल गन व ऑक्सीमीटर या दोन वस्तूंची किंमत अवाच्या सवा घेतली जात आहे. पाच हजारांपर्यंत असलेल्या थर्मल गनची खुल्या बाजारात आठ हजार रुपये लावण्यात आले आहेत, तर ऑक्सीमीटरची किंमतदेखील दुप्पट आहे. औषध प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

कट प्रॅक्टिसच्या नावाखाली औषध कंपन्यांचीही रुग्ण ग्राहकांकडून लुबाडणूक सुरू आहे. टाळेबंदी लागू करण्यात आल्यापासून अत्यावश्यक सेवा म्हणून औषधाची दुकाने सुरू ठेवण्यात आलेली आहेत. तेव्हापासून मुखपट्टी, जंतुनाशके, रोगप्रतिकारशक्ती औषधांचा साठा नाही असे सांगून ग्राहकांची लूटमार होत होती. आता टाळेबंदी उठल्यानंतरही लूटमार काही प्रमाणात कमी झाली असली तरी थर्मल गन व ऑक्सीमीटरसारख्या अत्यावश्यक वैद्यकीय साहित्यामध्ये लुबाडणूक सुरू आहे.

शासनाने आता ‘आपले कुटुंब, आपली जबाबदारी’ ही मोहिम हाती घेतली आहे. यानुसार दररोज घराबाहेर पडणाऱ्या नोकरदार नागरिकानेही आता ही थर्मल गन व ऑक्सीमीटर हे साहित्य आपल्या कुटुंबासाठी खरेदी करण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळे जवळपास चार हजार रुपयांचे ऑक्सीमीटर हे आठ हजार रुपयांना विकले जात आहे.  हे वैद्यकीय साहित्य आता सर्वसामान्यांच्या घरातदेखील आढळून येत आहे. त्याचबरोबर थर्मल गन शरीरातील तापमान तपासण्यासाठी विकत घेतली जात आहे. या दोन्ही वस्तूंचा काळा बाजार सुरू असून अन्न व औषध प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष सुरू आहे. खासगी रुग्णालयांनंतर औषध दुकानांनीही या वैद्यकीय वस्तूंच्या विक्रीमध्ये लूट सुरू केली महापालिकेने तपासणी करावी, अशी मागणी केली जात आहे.

रुग्णालयांचेही लेखापरीक्षण

शहरातील खासगी रुग्णालयांनी कोविड रुग्णांची आर्थिक लूट सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना त्यांचे जादा वसूल करण्यात आलेले ३२ लाख रुपये परत देण्यात आले आहेत. ही संख्या आणखी वाढणार आहे. त्यासाठी पालिकेचे एक पथक तयार करण्यात आले असून आतापर्यंत कोविड रुग्णांच्या शुल्काचे मेडिकल ऑडिट केले जात आहे. यात दोषी आढळणाऱ्या रुग्णालयांना सद्य:स्थितीत कारवाई केली जाणार नाही कारण आता रुग्णालये महत्त्वाची आहेत, पण जादा लूटमार करणाऱ्या रुग्णालयांचा परवाना रद्द करण्याची कारवाई नंतर केली जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी पालिकेच्या एका पथकाने दहा रुग्णालयांचे मेडिकल ऑडिट करण्यास सुरुवात केली आहे.

औषध दुकानांच्या या जादा किंमत घेण्याच्या तक्रारी आलेल्या आहेत. त्यांच्याबद्दल अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करण्यात येणार असून पालिका प्रशासनदेखील लक्ष ठेवणार आहे. अशा प्रकारे ग्राहकांची आर्थिक लुबाडणूक करणाऱ्या कोणत्याही घटकाकडे दुर्लक्ष केले जाणार नाही.

– अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई पालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2020 1:40 am

Web Title: thermal gun oximeter cost double in navi mumbai medical shops zws 70
Next Stories
1 खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लूट सुरूच
2 पालिकेतील ६० ‘करोनायोद्धे’ करोनाग्रस्त
3 तोतया नौदल अधिकाऱ्याला अटक
Just Now!
X