लोकसत्ता वार्ताहर

नवी मुंबई : नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या वाशी येथील बस स्थानकाचे काम सुरू असल्याने वाशी-कोपरखरणे रस्यावर तात्पुरता थांबा दिला आहे. मात्र एनएमएमटीसह इतर परिवहन सेवांच्या बस एकाच वेळी येत असल्याने गैरसोय होत आहे. बसच्या रांगा मुख्य चौकातील सिग्नलपर्यंत लागत असल्याने वाहतूककोंडीत भर पडत आहे.

वाशी बस स्थानकात खोपोली नगरपालिका, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका तसेच बेस्ट आणि एसटी महामंडळाच्या बसचा वाशी डेपो हा शेवटचा थांबा आहे. मात्र सध्या डेपोच बंद असल्याने बस थांबवायची कुठे? असा प्रश्न बसचालक व वाहकांसमोर निर्माण होत आहे. सेवा रस्ताही यासाठी कमी पडत आहे.

नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या वाशी बस स्थानकाच्या जागेवर अद्ययावत बस स्थानक व वाणिज्य संकुल उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी १५९ कोटी ८० लाख ७ हजार ६०रुपये  इतका खर्च करण्यात येणार असून २६ महिन्यांत हे काम पूर्ण करावयाचे आहे. सप्टेंबर २०२१ पर्यंत कामाची मुदत आहे. या कामासाठी गेल्या १३ महिन्यांपासून बस स्थानकाला पत्र्याचे संरक्षण देत तो बंद करण्यात आला आहे. दरम्यान मंजुरीमुळे काम रखडले होते. ते आता सुरू करण्यात आले आहे.

वर्षभरापासून बस स्थानक बंद असल्याने वाशी-कोपरखरणे रस्त्यावर बस स्थानकाच्या बाहेर तर दुसऱ्या बाजूला विष्णुदास भावे नाटय़गृहाबाहेर एनएमएमटी बससाठी तात्पुरते थांबे करण्यात आले आहेत. इतर बस सेवांसाठी मुख्य रस्त्यालगतच्या सेवा रस्त्यावर थांबा दिला आहे. मात्र ही जागा अपुरी पडत आहे. एकाच वेळी अनेक बस दाखल होताच सिग्नलपर्यंत वाहतूककोंडी होत आहे. प्रवाशांनाही या ठिकाणी गैरसोयींना सामोरे जावे लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.