रबाळे-घणसोली स्थानकादरम्यान ओव्हरहेड तुटली

ठाणे-वाशी-पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावरील रबाळे-घणसोली रेल्वे स्थानकादरम्यान सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास ओव्हरहेड वायर तुटल्याने लोकल सेवा साडेतीन तास ठप्प झाली. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. दुपारी १२.३० नंतर सेवा सुरू झाली.
रबाळे-घणसोली दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली. त्यामुळे सेवा ठप्प झाली. मार्गावरील ऐरोली, रबाळे, घणसोली, कोपरखरणे आणि तुभ्रे रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची तुडुंब गर्दी झाली. वाहतुकीची पर्यायी व्यवस्था म्हणून प्रवाशांनी रिक्षा स्टँड गाठले; परंतु चालक प्रवाशांकडून जादा भाडे आकारत होते. एनएमएमटी, बेस्ट, एसटीच्या बसगाडय़ा खचाखच भरून येत असल्याने त्यात चढणे तीन स्थानकांवरील प्रवाशांना जवळजवळ अशक्य झाले होते.
काही प्रवाशांनी ‘लेटमार्क’ बसू नये यासाठी घरीच जाणे पसंत केले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने त्यांना वाहतुकीची पर्यायी व्यवस्था करून केंद्रावर जावे लागले. त्यांच्याकडून रिक्षाचालकांनी अवाजवी भाडे आकारले.
नवी मुंबई परिवहन सेवेने या वेळी २५ जादा बसगाडय़ा सोडल्या होत्या; परंतु ठाणे-बेलापूर मार्गावरील घणसोली येथील नोसिल नाक्याजवळ पुलाचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी झाली होती. सव्‍‌र्हिस रोडवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कळवा नाका येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयाजवळ पुलाचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी झाली. ठाणे सिडको स्टॉपपासून विटावापर्यंत वाहतूक कोंडी झाल्यामुळे वीस मिनिटांच्या अंतरासाठी एक तासाचा कालावधी लागत होता.