नवी मुंबई : करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीचा फटका सर्वच घटकांना बसला असून हातावर पोट असलेला, पण सर्वापासून दुर्लक्षित अशा तृतीयपंथीयांवरही उपासमारीचे संकट ओढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सिग्नल, दुकाने, घरोघरी पैसे वसूल करून दैनंदिन जीवन जगणाऱ्या या पंथातील काही तृतीयपंथी अस्वस्थ झाले आहेत.

देशात पाच ते सहा लाख तृतीयपंथीयांची संख्या आहे. यातील अर्धेअधिक तृतीयपंथी घरदार सोडून स्वतंत्र जीवन जगत असतात. देशातील एकूण लोकसंख्येच्या आठ टक्के तृतीयपंथीयांची लोकसंख्या ही मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरंत आहे. त्यामुळे एमएमआरडीए क्षेत्रात ४० हजार तृतीयपंथी राहतात असे एका पाहणीत आढळून आले आहे. मुंबईमध्ये या पंथाची संख्या २८ हजारांच्या घरात आहे.

नवी मुंबई शहर उभारणीनंतर काही तृतीयपंथीयांनी २५ वर्षांपूर्वी नवी मुंबईकडे आपला मोर्चा वळविला आणि वाशीजवळील कोपरी गावात आपले बस्तान बसविले. त्यामुळे तृतीयपंथीयांचे कोपरी गाव हे एक प्रकारचे मुख्यालय झाले आहे.

अनेक तृतीयपंथीयांनी जमविलेल्या पैशाने या ठिकाणी ग्रामस्थांची सुमारे अर्धा एकर जमीन विकत घेतली आणि आता त्या ठिकाणी टोलेजंग इमारती उभारल्या आहेत. त्यामुळे एकत्रित आलेल्या काही तृतीयपंथीयांना या इमारतीतील घरे व दुकानांचे चांगले भाडे मिळत आहे. हे तृतीयपंथी श्रीमंत या वर्गवारीत मोडले जात असून या संचारबंदीच्या काळात त्यांच्या उदहनिर्वाहाचा तसा गंभीर प्रश्न राहिलेला नाही, मात्र याच वेळी मुंबई, ठाणे, नवी मुंबई या बडय़ा शहरांतील मुख्य सिग्नल, एपीएमसीसारख्या मोठय़ा बाजारपेठा, दुकाने, नवीन सुरू होणारे व्यवसाय या ठिकाणी हक्काने पैसे वसूल करणाऱ्या तृतीयपंथीयांची गेली काही दिवस चांगलीच पंचाईत झाली आहे. टाळेबंदीत घरी राहावे लागल्याने हातावर पोट असणाऱ्या या घटकाची उपासमार सुरू झाली आहे. अन्नधान्य, तयार जेवण, अथवा प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे साहित्य वाटप करण्यासाठी या घटकाकडे मात्र कोणी फारसे लक्ष देत नसल्याचे दिसत आहे.

समाजात आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अगोदरच दुर्लक्षित असा आहे. त्यात संचारबंदीमुळे आम्ही बाहेर पडू शकत नाही. दिवसभर कमवायचे आणि त्यावर उदरनिर्वाह करायचा असा आमचा दिनक्रम बंद झाला आहे. आमच्यातही काही सर्व आलबेल असलेले आहेत, पण गरीब तृतीयपंथीयांची उपासमार सुरू झाली आहे.

– पिंकी अम्मा (तृतीयपंथी), वाशी