श्रीगणेश विर्सजनाच्या मिरवणुकीदरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पोलिसांनी वाशीतील शिवाजी चौकात वाहनांना तीन दिवस प्रवेशबंदी केली आहे. या परिसरातील वाहतूक इतर मार्गानी वळविण्यात आली आहे.
गणेशोत्सव शांततेमध्ये साजरा व्हावा यासाठी पालिका व पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केली असून गणेश विसर्जनासाठी आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. सर्वाधिक गणेशमूर्ती विर्सजन वाशी गावाच्या तलावामध्ये होत असल्याने वाहतूक विभागाने २१, २३ व २७ सप्टेंबर या दिवशी वाशी परिसरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल केला आहे. शिवाजी चौकात विसर्जनासाठी येणारी वाहने वगळता इतर वाहनांना प्रवेशबंदंी केली आहे. ऐरोली, कोपरखरणेकडून वाशीत येणारी वाहने ब्लू डायमंड सिग्नल चौकातून कोपरी सिग्नलमार्गी पाम बीच रस्त्यावरून जातील. वाशी रेल्वे स्थानक ते वाशी महामार्गावरून बस थांब्याच्या पुढून डावीकडे वळण घेऊन खाली उतरून पाम बीचमार्गे महात्मा फुले चौक, अरेंजा सर्कलवरून शिवाजी चौकाकडे न येता कोपरी सिग्नल अथवा महात्मा फुले चौकाकडे वळून जाणार आहेत. वाहतूक पोलीस उपआयुक्त अरविंद साळवे यांनी ही माहिती दिली.