21 April 2019

News Flash

पनवेलमध्ये भर रस्त्यात मोबाइल विक्री

स्वस्त दराचे आमिष दाखवून फसवणुकीची शक्यता

|| सीमा भोईर

स्वस्त दराचे आमिष दाखवून फसवणुकीची शक्यता

नामांकित कंपन्यांचे सहा ते आठ हजार रुपयांना मिळणारे मोबाइल अवघ्या दोन हजार रुपयांत देण्याचे आमिष दाखवून पनवेलमध्ये भर रस्त्यात मोबाइल विक्री सुरू आहे. पनवेल रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर हातात एखादा मोबाइल घेऊन ग्राहकांच्या शोधात असलेल्या या महिलांकडून नवख्या प्रवाशांची फसवणूक केली जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

पनवेल स्थानकात उतरणारे व मुंबई, नवी मुंबईसारख्या शहरांत पहिल्यांदाच आलेल्या प्रवाशांना हेरून या महिला त्यांच्याकडे मोबाइल खरेदी करण्याची गळ घालतात. ‘गावाकडे जायचे आहे. बसभाडय़ासाठी पैसे नाहीत. त्यामुळे स्वत:चा मोबाइल विकत आहे’ असे सांगून या महिला ग्राहकाला भावनिक साद घालतात. त्यांच्या हातातील मोबाइलची किंमत सहा ते आठ हजार रुपये असताना अवघ्या दोन हजार रुपयांत मोबाइल विकण्याची तयारी त्या दर्शवतात.

विशेष म्हणजे, हातातील मोबाइल पसंत नसल्याचे एखाद्याने सांगताच आपल्या खांद्याला लटकलेल्या पिशवीतून त्या दुसऱ्या कंपन्यांचे मोबाइल बाहेर काढतात. त्यामुळे ‘पैसे नसल्याची’ त्यांची विनवणी खोटी असल्याचे उघड होते.

या महिलांना खोलात जाऊन विचारणा केली असता, हे मोबाइल मनीष मार्केटमधून आणत असल्याचे सांगतात. मात्र, एका मोबाइल कंपनीच्या कर्मचाऱ्याशी संपर्क केला असता, इतके स्वस्त हे मोबाइल विकताच येऊ शकत नाहीत, असे त्याने सांगितले. ‘मनिष मार्केटमध्ये मोबाइलची सवलतीच्या दरांत विक्री होते. मात्र, ती सवलत इतकी जास्त असू शकत नाही. त्यामुळे हे मोबाइल एकतर चोरीचे किंवा बनावट असू शकतात,’ असे त्याने सांगितले.

आम्ही पर्याय नाही म्हणून हा व्यवसाय करतो. घरात लग्नाच्या तीन मुली आहेत. आम्हाला दुसरा उद्योगधंदा मिळाला तर आम्ही हे काम सोडून देऊ. हे मोबाइल आम्ही मनीष मार्केटमधून आणतो. – कमळाबाई, मोबाइल विकणारी महिला

या महिलांची सखोल चौकशी करून त्यांना ताब्यात घेतले जाईल, अशा प्रकारे रस्त्यावर मोबाइल विकणे चुकीचेच आहे. त्यामुळे खरेदी करणारेही अडचणीत येऊ  शकतात.   – विनोद चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पनवेल शहर पोलीस ठाणे

 

First Published on November 6, 2018 2:50 am

Web Title: unauthorized mobile sales in navi mumbai