विकास महाडिक

खासगी रुग्णालयांकडे मात्र मुबलक साठा, दिवसाला पाच हजार जणांचे लसीकरण?

नवी मुंबई : लसीकरणाची जय्यत तयारी करण्यात आल्याने दिवसाला तीस हजार नागरिकांना लस टोचण्याची क्षमता बाळगणाऱ्या नवी मुंबई पालिकेला आठवडय़ातून केवळ दोन ते तीन वेळा काही शेकडा लसींच्या मात्रा मिळत आहेत. मात्र त्याच वेळी खासगी रुग्णालयांत दिवसाला पाच हजार नागरिकांना लस देण्यात येत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे लसपुरवठा करणाऱ्या पुरवठादारांकडून पालिकेला सापत्नाची वागणूक दिली जात असल्याचे दिसून येत आहे.

नवी मुंबई पालिकेकडे पैसा, पायाभूत सुविधा आणि लसीकरणाची सर्व तयारी असताना देखील कोणी लस देता का लस? असे म्हणण्याची वेळ आली आहे. पालिकेने काढलेल्या जागतिक निविदेला देखील फारसा प्रतिसाद लाभलेला नाही. त्यामुळे निविदेला आणखी मुदतवाढ देण्यात आली आहे. या सर्व जागतिकीकरणात रशियाची स्पुटनिक लसीचा पुरवठा करणाऱ्या चार कंत्राटदारांनी मात्र मुंबईप्रमाणे नवी मुंबईशी संपर्क साधला आहे.

नवी मुंबई पालिका क्षेत्रात लसीकरण करणाऱ्या नागरिकांची लोकसंख्या साडेदहा लाख आहे. नवी मुंबई पालिकेने आतापर्यंत तीन लाख लसीकरणाचा टप्पा पार केला आहे. तिसरी लाट येण्यापूर्वी पालिका सर्व नागरिकांचे लसीकरण करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी शहरातील प्रत्येक विभागामध्ये लसीकरण केंद्र उभारण्यात आली असून वाशी येथील भावे नाटय़गृहात जम्बो लसीकरण केंद्र उभारण्याची तयारी ठेवण्यात आली आहे. दिवसाला २५ ते ३० हजार नागरिकांचे लसीकरण करण्याची पालिकेची तयारी आहे. केंद्र सरकारकडून राज्य सरकारच्या माध्यमातून     मिळणाऱ्या लसींच्या मात्रा मर्यादित असून आता केवळ ४५ वयापेक्षा जास्त नागरिकांना लस देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने त्याला अधिक मर्यादा आलेल्या आहेत. सरकारकडून मिळणाऱ्या लसीची मर्यादा लक्षात घेता नवी मुंबई पालिकेने मुंबईप्रमाणे चार लाख लसींचे डोस खासगीरित्या खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून जागतिक पातळीवर त्यासाठी पुरवठादारांच्या निविदा मागविण्यात आल्या आहेत. त्याला गेली १५ दिवस प्रतिसाद नाही पण मुंबई पालिकेला राशियाची स्पुटनिक लसपुरवठा करणाऱ्या चार पुरवठादारांनी नवी मुंबई पालिका प्रशासनाशी संपर्क साधला आहे. त्यांच्यासाठी आणखी एक आठवडय़ाची मुदत वाढ देण्यात आली आहे. त्यामुळे नवी मुंबई पालिका क्षेत्राला आता स्पुटनिक लस खासगी रित्या मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सरकार वगळता कोविशिल्ड अथवा कोव्यक्सीन लसीच्या पुरवठादारांनी पालिकेकडे साधी विचारपूसदेखील केली नाही. पुण्यातून कोविशिल्ड मिळावी यासाठी पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी राज्यातील मातब्बर नेत्याच्या माध्यमातून संर्पक साधण्याचा प्रयत्न केला पण त्यालाही यश आले नाही. सरकारकडून मिळणाऱ्या लसीचे काही शेकडा डोस पालिकेच्या पदरात पडत असून त्याचे नियोजन करून नागरिकांना दिले जात आहेत. मागील एक आठवडय़ात पालिकेच्या नियोजनावर तीन वेळा पाणी फेरले गेले. कारण २५,२६,२८ या तीन दिवस पालिकेला लसींचा एकही डोस मिळाला नाही. त्यामुळे लस मिळेल या आशेने केंद्रावर ताटकळत बसलेल्या नागरिकांना सरतेशेवटी निराशा पदरात पडल्याचे चित्र होते. लोकसंख्येच्या मानाने दहा अकरा लाखांच्या घरात असलेल्या शहरातील नागरिकांचे लवकरात लवकर लसीकरण करून त्यांना करोना भयमुक्त करण्यासाठी पालिका पदरमोड करून लसीकरण करण्याचा प्रयत्न करीत असताना अपयश येत आहे. मात्र या उलट नवी मुबंईतील सहा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दररोज नागरिकांचे खासगीरित्या लसीकरण होत असून बेलापूरमधील एका रुग्णालयाने तर दिवसाला पाच हजार नागरिकांचे लसीकरण करण्याची तयारी ठेवली आहे. त्यावेळी पालिका प्रशासन आश्र्चय व्यक्त करीत आहे. खासगी रुग्णालयांना लस उपलब्ध होत असताना पालिकेला का नाही असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. नवी मुंबई पालिका राज्यातील एक श्रीमंत पालिका आहे. त्यामुळे चार लाख लस डोस खरेदी करण्यासाठी चाळीस कोटी रुपये खर्च करण्याची तयारी पालिकेने ठेवली आहे, पण लस मिळत नसल्याने प्रशासन हताश झाले आहे. खासगी रुग्णालयात मिळणारी लस ही एक हजार रुपयांच्या घरात आहे. बेलापूर येथील एक मोठे रुग्णालय ही लस डोस साडेआठशे रुपयांनी विकत आहे. खासगी रुग्णालयातील हे लसीकरण बिनबोभाट सुरू असताना नवी मुबंई पालिकेच्या लसीकरण केंद्रात मात्र शुकशुकाट पसरत आहे.

गरीब लहान मुले, नागरिकांनी जायचं कुठे?

सरकारकडून मिळणाऱ्या लसींमध्ये केवळ ४५ वयापुढील नागरिकांचे लसीकरण करण्यात यावे असे आदेश आहेत. त्यामुळे इतरांना लस देता येत नाही. परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे एक जूनला लसीकरण केले जाणार आहे, पण आता करोना हा लहान मुलांमध्ये मोठय़ा प्रमाणात आढळून येत असून मुलांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे त्या मुलांचे लसीकरण करणे ही अतिशय महत्त्वाची बाब आहे, पण तयारी असताना खासगीरित्या पालिकेला लस मिळत नाही, मग गरीब गरजू लहान मुलांनी व नागरिकांनी जायचं कुठे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

३ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण

नवी मुंबई : १६ जानेवारीपासून नवी मुंबईत करोना लसीकरण सुरू असून आतापर्यंत ३ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. ३ लाख ६ हजार ७२६जणांना पहिली मात्रा तर ९७ हजार १७६ नागरिकांना दुसरी मात्राही देण्यात आली आहे.

वाशी, नेरुळ व ऐरोली ही रुग्णालये, तुर्भे माता बाल रुग्णालय, २३ नागरी आरोग्य केंद्र तसेच ग्रोमा सेंटर एपीएमसी मार्केट दाणा बाजार, भाजीपाला बाजार समिती, रेल्वे कॉलनी, हेल्थ युनिट जुईनगर त्याचप्रमाणे ईएसआयएस हॉस्पिटल सेक्टर ५ वाशी व विष्णुदास भावे नाटय़गृह या केंद्रांसह इनॉर्बिट व ग्रँड सेंट्रल मॉलमधील पार्किंगमध्ये ड्राइव्ह इन लसीकरण सुरू आहे. एकूण ३४ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. २९ मे पर्यंत एकूण ३ लक्ष ६ हजार ७२६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. ३१ जुलैपर्यंत ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना किमान पहिली मात्रा देण्याचे नियोजन आहे.