मासेमारी धोक्यात; नाल्यातून सांडपाणी

नवी मुंबई परिसरातील महापे, पावणे व रबाळे येथील नाले खाडीकिनारी मिळत असून यातून औद्योगिक वसाहतीतील रसायनमिश्रित पाणी व मलनिस्सारण वाहून येत आहे. किनारा या रसायनमिश्रित गाळात रुतला आहे. या ठिकाणी होणारी मासेमारीही धोक्यात आली असल्याचे सारसोळे येथील कोलवानी माता मित्र मंडळ या मच्छिमार संघटनेने सांगितले.

बेलापूर येथील दिवाळे गाव ते ठाणे खाडीपर्यंत पाच ते  सहा हजार मच्छिमार खाडीकिनारी मासेमारी करून आपली उपजीविका करीत आहेत. मात्र या ठिकाणी औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक सांडपाणी प्रक्रिया न करता नाल्यात सोडले जाते. हे नाले खाडीकिनाऱ्याला जोडले गेले आहेत. त्यामुळे बहुतेक वेळी मृत मासे जाळ्यात सापडत आहेत. कोपरी नाल्यात तर रासायनिक सांडपाणी सोडण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. मलनिस्सारण केंद्रातील बहुतांशी सांडपाणीही प्रक्रिया न करताच सोडले जात असल्याचा आरोप या संघटनेने केला आहे. त्यामुळे खाडीत गाळाचे प्रमाण वाढले आहे. या ठिकाणी ९० टक्के मासेमारीत घट झाली आहे.

याबाबत महापालिका पर्यावरण समिती सभापती दिव्या गायकवाड यांनीही औद्योगिक क्षेत्रातील रसायनयुक्त तसेच मलनिस्सारण वाहिन्यांतून प्रक्रिया न करता सांडपाणी सोडले जात असल्याचे मान्य केले आहे.

नवी मुंबईत दिवाळे गाव ते ऐरोलीपर्यंत हजारो मच्छिमार मासेमारी करीत आहेत. मात्र या सांडपाण्यामुळे गाळ साचत आहे. परिणामी मासेमारी धोक्यात आली आहे.   – मनोज मेहेर, अध्यक्ष, कोलवानी माता मित्र मंडळ, सारसोळे

याबाबत गेल्या आठवडय़ातच महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडे पाठपुरावा केला आहे. ईटीपी व मलनिस्सारण प्रकल्पाची सांडपाण्याच्या तुलनेत पात्रता कमी आहे. त्यामुळे बहुतांश वेळी प्रक्रिया न करताच सांडपाणी सोडले जाते. याबाबतच्या लेखी अहवालाची मागणी प्रदूषण मंडळाकडे केली आहे.    – दिव्या गायकवाड, सभापती, पर्यावरण समिती