10 electric double decker buses inducted into NMT fleet | Loksatta

लवकरच नवी मुंबईकरांना मिळणार डबल डेकरची सफर ! एनएमटीच्या ताफ्यात १० विद्युत डबल डेकर बस दाखल

नवी मुंबई परिवहन विभागाचे सक्षमीकरण करण्यासाठी तसेच प्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरणपूरक अशा विद्युत बस खरेदी करण्यात येत आहेत.

लवकरच नवी मुंबईकरांना मिळणार डबल डेकरची सफर ! एनएमटीच्या ताफ्यात १० विद्युत डबल डेकर बस दाखल
एनएमटीच्या ताफ्यात १० विद्युत डबल डेकर बस दाखल

नवी मुंबई परिवहन विभागाकडून पर्यावरणपूरक आणि इंधन बचतीकडे विशेष लक्ष दिले जात असून परिवहनाच्या ताफ्यात अधिकाधिक सीएनजी आणि विद्युत बस चालवल्या जात आहेत. सध्या एनएमएमटी डीझेल पेक्षा जास्त १०९ सीएनजी तर १८० विद्युत बस रस्त्यावर धावत आहेत. आता लवकरच नवीन १० विद्युत डबल डेकर बस दाखल होणार आहेत. या विद्युत बसबाबत करार झाला असून वर्कऑर्डर देखील काढण्यात आलेली आहे . येत्या ८ महिन्यात डबल डेकर बस नवी मुंबईकरांच्या सेवेत दाखल होतील अशी माहिती नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी दिली आहे.

हेही वाचा- विश्लेषण : मुंबईतील स्थलांतरित प्रवाळ वाचणार का? त्यांचे महत्त्व काय?

दिवसेंदिवस डिझेल, पेट्रोलचे वाढते दर यामुळे नवी मुंबई परिवहनाला आर्थिक फटका बसत होता. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होता त्यामुळे एनएमटीची चाके आणखीन तोट्यात गेली होती. नवी मुंबई परिवहनाला उभारी देण्यासाठी महापालिका आर्थिक हातभार लावत आहे. मात्र नवी मुंबई महापालिका एनएमएमटीला असे किती वर्ष आर्थिक टेकू देणार, त्यामुळे यंदा एनएमएमटीला अधिक सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये सीएनजी आणि विद्युत बसचा वापर वाढवून तसेच बस आगारात वाणिज्य संकुल बांधून वापर करण्यात येणार आहे . आता सर्वच स्तरातून दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या इंधनदरवाढीमुळे सीएनजी किंवा विद्युत वाहनांना प्राधान्य दिले जात आहे . एनएमएमटीने देखील पर्यावरण पूरक, प्रदूषण टाळण्यासाठी डिझेल पेक्षा सीएनजी आणि विद्युत वाहनांना पसंती दिली आहे. त्याच अनुषंगाने केंद्र शासनाच्या फेम १ आणि फेम २ योजनेअंतर्गत नवी मुंबई परिवहनाच्या ताफ्यात १८०बस घेण्यात आल्या आहेत. आता आणखीन ७५ बस घेण्यात येणार आहेत. त्यापैकी १५ विद्युत बस आणि पर्यटकांकरिता दोन विद्युत डबल डेकर बस येत्या ३ महिन्यांत दाखल होणार आहेत . तर १० विद्युत डबल डेकर बस ८ महिन्यांत दाखल होणार असून नवी मुंबईकरांना लवकरच डबल डेकरची सफर करता येणार आहे.

हेही वाचा- धारावी पुनर्विकासात अपात्र रहिवाशांनाही घरे; चार चटई क्षेत्र निर्देशांकाचा वापर

५१% पर्यावरण पुरक बस रस्त्यावर

मुंबई परिवहन विभागाकडे एकूण ५६७ बस आहेत. त्यापैकी दररोज ४३०-४५०बस सुरु असतात. यामध्ये डिझेल वरील १९७ बस आहेत. १८० विद्युत बस तर १०९ सीएनजीवर चालणाऱ्या बस रस्त्यावर धावत आहेत . एकंदरीत ५१% पर्यावरण पुरक तर ४९% डिझेल वरील बस सुरू आहेत.

हेही वाचा- रखडलेल्या झोपु योजना म्हाडा पूर्ण करणार; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी मुंबई परिवहन विभागाचे सक्षमीकरण करण्यासाठी तसेच प्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरणपूरक अशा विद्युत बस खरेदी करण्यात येत आहेत. आणखीन पर्यावरणपूरक विद्युत बस खरेदी करण्यात येत आहेत.येत्या तीन महिन्यांत १५ विद्युत बस तर ८ महिन्यांत डबल डेकर बस दाखल होईल, अशी माहिती नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-09-2022 at 12:26 IST
Next Story
नवी मुंबई शहरातील इलेक्ट्रीक चार्जिंग स्थानक नावापुरते….