नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी नुकत्याच प्रभागनिहाय प्रारूप मतदारयाद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्याबाबत हरकती घेण्यासाठी १ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली असून आतापर्यंत १०० पर्यंत हरकती प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे १ जुलैपर्यंत या मतदार याद्यांच्या हरकतींबाबतची संख्या वाढणार आहे.

नवी मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना निश्चित झाल्यानंतर आरक्षण सोडत आणि आता प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. प्रत्यक्ष पालिका निवडणुकीत महत्त्वाचे ठरणारे मतदार व त्यांच्या याद्या यांच्याबाबत इच्छुकांकडून छाननी सुरू आहे. आगामी पालिका निवडणुकीत ८,४५,५२४ एकूण मतदार निश्चित करण्यात आले असून प्रभागनिहाय ४१ प्रभागांच्या मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तर या प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार याद्यांवर १ जुलैपर्यंत हरकती व सूचना घेता येत आहेत.

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ३१ मे २०२२ पर्यंतची अद्ययावत केलेली यादी अंतिम करण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ४१ प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत. त्यामध्ये ४० प्रभागात ३ सदस्य तर १ प्रभागात २ सदस्य अशा १२२ सदस्यांसाठी निवडणूक होणार आहे. पालिका हद्दीतील मागील जनगणनेच्या नुसार शहराची लोकसंख्या ११ लाखांपेक्षा अधिक होती तर आता प्रत्यक्ष लोकसंख्या १५ लाखांपेक्षा अधिक आहे. नवी मुंबई शहरात ४१ प्रभाग असून सर्वाधिक मतदार घणसोलीतील तर सर्वात कमी मतदार वाशी येथील एका प्रभागात आहेत.

आज आयुक्तांची पत्रकार परिषद नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ करिता राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रभागनिहाय मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या असून १ जुलैपर्यंत हरकती सूचना घेण्याची मुदत देण्यात आली आहे. याबाबतची माहिती देण्यासाठी पालिका आयुक्त अभिजीत बांगर पालिका मुख्यालयात प्रसार माध्यमांशी अधिक माहिती देणार आहेत.