उरण तालुक्यातील ‘चिरनेरच्या फ्रेन्डस ऑफ नेचर’ ही निसर्गप्रेमी संस्था असून पक्षी व प्राण्यांच्या तसेच निसर्गाच्या संरक्षणासाठी गेली तेरा वर्षे काम करीत आहे. या संस्थेने रविवारी उरणमध्ये जागतिक चिमणी दिनानिमित्ताने चिमणी वाचविण्याचे आवाहन करीत उरणच्या जनतेला टाकाऊतून टिकाऊ अशी चिमण्यांना अन्न व पाणी देण्यासाठी उपयुक्त असलेली नैसर्गिक घरटी दिली. या उपक्रमाला उरणच्या जनतेने उत्स्फूर्त पाठिंबा देत १२५ पेक्षा अधिक घरटी घेऊन चिमणी वाचविण्याच्या मोहिमेत आपला वाटा उचलल्याने जनतेमधील निसर्गप्रेम दिसून आले.
एक घरटं चिऊसाठी म्हणत फ्रेन्डस ऑफ नेचर संस्थेने जागतिक चिमणी दिन साजरा केला. यावेळी उरणच्या गणपती चौकात संस्थेने चित्र प्रदर्शन भरविले होते. या प्रदर्शनात चिमणीचे मानवी जीवनात किती महत्त्व आहे. चिमण्यांचा चिवचिवाट हा लहानग्यांसाठी आवश्यक आहे. त्यामुळे चिमणी हा नामशेष होत असलेला निसर्गातील पक्षी टिकविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपापल्या परीने चिमणी वाचविण्याचे काम करण्याचे आवाहन फ्रेन्डस ऑफ नेचरचे अध्यक्ष जयवंत ठाकूर यांनी यावेळी केले. चिमणीचे महत्त्व सांगत असताना चिमण्या या आपल्या अंगणात, खिडकीत आल्या तर आपल्या मुलांना त्यांच्या ओरडण्याचे कौतुक असते, ते पाहून त्यांना आनंद होतो. त्यामुळे मुले खेळू लागतात. त्यांना जेवण देताना चिऊताई दाखविण्याची प्रथाच आहे. त्यामुळे निसर्गातील इतर पक्ष्यांपेक्षा चिऊ म्हणजे चिमणी हा पक्षी टिकणं आणि त्याची संख्या वाढणे गरजेचे आहे. यासाठी चिमणी येऊन दाणे घेऊन जाईल अशी कागदी नैसर्गिक घरटी या संस्थेच्या माध्यमाधून तयार करून ती मोफत नागरिकांना देत चिमणी वाचविण्याच्या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन यावेळी या निसर्गप्रेमी संघटनेने केले. तसेच वाढत्या उन्हात ज्या ज्या ठिकाणी नागरिकांना शक्य असेल तेथे जंगलात पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी ठेवून निसर्ग रक्षणाचे काम करण्याचेही आवाहन चिमणी दिनानिमित्ताने करण्यात आले. या उपक्रमाला विविध क्षेत्रांतील सामाजिक कार्यकर्त्यांनीही सहकार्य केले. तसेच घरटी बनविण्यासाठी मदत केली.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Mar 2016 रोजी प्रकाशित
चिऊताईच्या अस्तित्वासाठी १२५ घरटी मोफत
एक घरटं चिऊसाठी म्हणत फ्रेन्डस ऑफ नेचर संस्थेने जागतिक चिमणी दिन साजरा केला.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 22-03-2016 at 01:04 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 125 nests for existence of birds