पनवेल : शीव पनवेल या ३० किलोमीटर अंतरावर पादचा-यांना सूरक्षित रस्ता ओलांडता यावा यासाठी १८ भुयारी मार्ग बांधण्यात आले होते. मात्र अनेक वर्षांनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली असून हे भुयारी मार्ग विनावापरात असल्याने त्याचे तोडकाम दोन दिवसांपासून सुरू करण्यात आले आहे. शीव पनवेल महामार्ग रुंदीकरण व कॉंक्रीटीकरणासाठी नेमलेल्या सल्लागार समितीने चुकीचा सल्ला देऊन त्याची अंमलबजावणी करणा-या अभियंत्यांनी दुर्लक्ष केल्याने शासनाचे कोट्यावधी रुपयांचे नूकसान झाल्याने हा खर्च सरकार कोणाकडून वसूल करणार असा प्रश्न सर्वसामान्य प्रवासी विचारत आहेत.
शीव पनवेल महामार्गावरील प्रवास अवघ्या तीस मिनिटांत जलदगतीने करण्यासाठी आठ पदरी महामार्ग कॉंक्रीटचा बांधण्याचे नियोजन आखण्यात आले. नियोजनकर्त्यांनी रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्गाची आखणी केली. मुंबईचे चेंबूर येथील बीएआरसी ते कळंबोली सर्कल या पल्यापर्यंत १८ विविध भुयारी मार्ग बांधण्याचे काम पादचा-यांसाठी पूर्ण करण्यात आले. महामार्गावरील कॉंक्रीटीकरणाच्या कामावेळी हा भुयारी मार्ग वापरात येणार नाही याबाबतची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या काही अभियंत्याना असताना सुद्धा सचिवालयातील वरिष्ठांमुळे हे भुयारी मार्ग बांधण्यात आले. बांधकामावेळीच या भुयारी मार्गात १० ते १५ फूट पाणी साचत होते.
नवी मुंबई परिसरात खाडी क्षेत्रावर माती व राडारोड्याचा भराव टाकून शहरे उभी केली आहेत. कांदळवनाक्षेत्राला लागून असलेल्या या महामार्गातील भुयारी मार्ग समुद्रसपाटीपेक्षा खोल असल्याने त्यामध्ये पाणी साचणे हे नित्याचे होते. तरीही सार्वजनिक बांधकाम विभागातील काही वरिष्ठांच्या आदेशामुळे महामार्गावर डासांचे उत्पत्ती केंद्र जाणिवपूर्वक बांधण्यात आली. भुयारी मार्गांमुळे महामार्गाच्या कॉंक्रीटीकरणाचा खर्च सुद्धा वाढला. सूरूवातीला १८०० कोटी रुपये खर्च करून बांधलेला महामार्गाचा खर्च महामार्गाच्या हस्तांतरणावेळी २२०० कोटींवर गेला. तब्बल १२ वर्षानंतर १८ भुयारी मार्ग विना वापरात असल्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उच्चपदस्थांना जाग आल्यानंतर शनिवारपासून हे भुयारी मार्ग पुर्णता पाडण्याचे काम हाती घेण्यात आले. सध्या कळंबोली सर्कलच्या विस्ताराचे काम सुरू असून कामोठे व कळंबोली येथील भुयारी मार्ग तोडण्याचे काम सुरू आहे.
सरकारी यंत्रणेला ज्या सल्लागार कंपनीने रुंदीकरणावेळी भुयारी मार्ग बनविण्याचा सल्ला दिला. तसेच ज्या कंपनीने समुद्रसपाटीपेक्षा खोल या भुयारी महामार्गाची आखणी (डीझाईन) केली आणि हा महामार्ग बांधताना ज्या अभियंत्यांच्या देखरेखीखाली हे भुयारी मार्ग बांधले त्या संबंधितांची सखोल चौकशी झाल्यास हे भुयारी मार्ग नेमके कोणासाठी बांधले याचा शोध लागू शकेल. संबंधित कामात भ्रष्टाचार झाला असल्यास संबंधितांकडून या बांधकामाची रक्कम वसुल करण्याची मागणी कामोठे येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन गायकवाड यांनी केली आहे.