दोन लाख ५१ हजार रुपयांचे नुकसान; जीवितहानी टळली
उरण तालुक्यातील पाच घरांना बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास एकाच वेळी आग लागली असून या आगीत घरातील सर्व सामान जळून खाक झाले आहे. सुदैवाने पाचही घरात कोणीच नसल्याने जीवितहानी टळली.
या आगीचे कारण समजू शकले नसून, पोलीस अधिक तपास करीत आहे. या घरांतील सर्व मिळून २ लाख ५१ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याची दखल घेत उरण तहसील कार्यालयातील महसूल विभागाने घरांच्या नुकसानीचे पंचनामे केले आहेत. नुकसानीचा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात येणार असल्याची माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आलेली आहे. असे असले तरी आतापर्यंत आग लागलेल्या घरांना शासनाकडून कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे पंचनामे हा शासकीय सोपस्कार ठरणार आहे.
अरबी समुद्राच्या खाडीकिनारी असलेले आवरे ग्रामपंचायत हद्दीतील कडाप्पे गावातील एका घरात एकूण पाच कुटुंबे राहत आहेत.
यामध्ये राजेंद्र परशुराम म्हात्रे, रवींद्र परशुराम म्हात्रे, रंजित परशुराम म्हात्रे हे तीन सख्खे भाऊ, तर प्रेमा धनाजी म्हात्रे व अरुण लक्ष्मण म्हात्रे यांच्याही घरांना आग लागली आहे. गावात राहण्यासाठी नवीन घर बांधल्याने बुधवारी आग लागलेल्या घरात कोणीच नव्हता त्यामुळे जीवित हानी टळली. मात्र घरातील सर्व सामान जळून खाक झाले आहे. यात घरातील साठवणूक केलेले धान्य तसेच घरातील कपाट त्यातील कपडे व किमती सामानही जळाले आहे.
घराचे छप्पर लाकडी असल्याने मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. आगीच्या प्रकरणाची तक्रार उरण पोलिसात दाखल करण्यात आली आहे. याचा तपास पोलीस करीत असल्याची माहिती देण्यात आली.

तहसील कार्यालयांनी मंडळ अधिकाऱ्यांकडून नुकसानीचे पंचनामे केल्याची माहिती उरणचे नायब तहसीलदार रवींद्र पाटील यांनी दिली आहे. आगीच्या नुकसानीचा मोबदला पीडितांना मिळेल का, असा प्रश्न केला असता आमचे काम वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्याचा असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. तर आतापर्यंतच्या आगीच्या प्रकरणात एकाही व्यक्तीला नुकसान भरपाई मिळालेली नाही. याचे मुख्य कारण म्हणजे आग लागून झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची तरतूदच नाही.