३०५ कोटींच्या विकासकामांना मंजुरी

उद्याने व मैदानांच्या विकासासाठी सहा महिन्यांपूर्वी २२ कोटी रुपये खर्च पालिकेच्या अभियंत्यांनी ढोबळपणे ठरविला होता.

विरोधानंतरही मैदान,उद्यानांच्या वाढीव खर्चाला मान्यता

पनवेल : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी अंदाजित २८० कोटी रुपये खर्चाच्या प्रशासकीय भवनच्या कामासह  १५ उद्याने व ६ मैदानांच्या विकासासाठी २७ कोटींच्या कामांना मंजुरी दिली. त्यामुळे सर्वसाधारण सभेत ३०५ कोटींच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली.

उद्याने व मैदानांच्या विकासासाठी सहा महिन्यांपूर्वी २२ कोटी रुपये खर्च पालिकेच्या अभियंत्यांनी ढोबळपणे ठरविला होता. मात्र प्रत्यक्षात आराखडा काढल्यानंतर हाच खर्च ५ कोटी रुपयांनी वाढला. या वाढीव खर्चाचा प्रस्ताव शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. यावेळी विरोधकांकडून प्रीतम म्हात्रे, गणेश कडू व गोपाळ भगत यांनी विरोध केला. मात्र या विषयाला भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी मंजुरी दिली.

पनवेल पालिका क्षेत्रातील सिडको मंडळाने नवीन पनवेल येथील ५ उद्याने, कळंबोलीतील ४ उद्याने, खारघरमधील ६ उद्याने आणि खारघरमधील ४ व कळंबोलीतील दोन मैदानांच्या विकासकामांचा वाढीव खर्चाला मंजुरीसाठी मान्यता घेण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. विरोधकांनी सध्या पाणी, जलवाहिनी व रस्ता बांधकाम, दुरुस्ती व मलनिस्सारण वाहिनी असे खर्च करणे शिल्लक असताना पालिका अनाठायी खर्च का करतेय असा प्रश्न उपस्थित करीत सादरीकरणाची मागणी केली. मात्र  सादरीकरणाची मागणी अमान्य करत माहिती हवी असेल तर पालिकेच्या अभियंत्यांकडून घेण्याचा सल्ला देत भाजपने हा विषय मंजूर केला. 

स्वराज्य भवनची रचना

सहा मजल्यांची प्रशासकीय इमारत असून तळघरात दोन वाहनचालक खोल्या, फॅनखोली, सव्‍‌र्हीस खोली, एसटीपी व वाहनतळ असणार आहे. तर तळमजल्यावर नागरी सुविधा केंद्र, भांडारविभाग, पत्रकार कक्ष, हिरकणी कक्ष, उपाहारगृह, दिव्यांग कक्ष, वाचनालय असेल. पहिला मजल्यावर संगणक कक्ष, बँक आणि एटीएम सेवा करण्यात येणार आहे. दुसरा मजल्यावर बहुउद्देशीय सभागृह, अग्निशमन, पर्यावरण, वृक्ष प्राधिकरण, आपत्ती व्यवस्थापन, कर, लेखा, लेखा परीक्षक आणि  घनकचरा व्यवस्थापन विभागाची कार्यालये असतील तर तिसऱ्या मजल्यावर पाणीपुरवठा, वीज विभाग, मलनिसारण, वैद्यकीय आरोग्य, ग्रंथपाल, सुरक्षा विभाग, माहिती व तंत्रज्ञान, मालमत्ता विभाग, क्रीडा आणि विधी विभाग असतील.

चौथ्या मजल्यावर नगररचना, शहर अभियंता, कार्य अभियंता (प्रकल्प), अभिलेख कक्ष, भविष्यातील विस्ताराकरीत मोकळी जागा ठेवण्यात येणार आहे. तर मुख्य दालने जशी की महापौर, उपमहापौर दालन, स्थायी समिती, सभागृह नेते, विरोधी पक्ष नेता, दोन सभागृह, आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांचे दोन वेगवेगळी दालने असतील. सहाव्या मजल्यावर पालिकेचे सभागृह असणार असून त्या ठिकाणी नगरसचिवांचे कार्यालय, नगरसेविकांसाठी कक्ष, बाल कल्याण समिती दालन, गटनेते दालन याच्यासह पत्रकारांना सभेचे वार्ताकन करण्यासाठीची जागा, अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठीची जागा, डिजिटल खोली, गटनेते दालन आदी सुविधा असणार आहेत. इमारतीच्या छतावर कलादालन असणार आहे. तर सदस्यांच्या सूचनांनुसार या ठिकाणी आता हॅलिपॅडची सुविधाही करण्यात येणार आहे, तर नवी मुंबईपालिकेप्रमाणे सदस्यांच्या सूचनेनंतर सर्वाधिक उंच राष्ट्रध्वजाची उभारणीही करण्यात येणार आहे.

पालिका विकसनशीलतेच्या वाटेवर

 महापालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी झाली असून यात ३०५ कोटींच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आल्याचे महापौर कविता चौतमोल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यांनी विकसनशील पालिकेच्या वाटेवर पनवेल पालिका असल्याचा दावाही या वेळी केला. या वेळी उपमहापौर जगदीश गायकवाड, पालिका सदस्य अनिल भगत, प्रकाश बिनेदार, महिला व बाल कल्याण सभापती मोनिका महानवर, प्रभाग समिती सभापती सुशीला घरत, हेमलता म्हात्रे, अनिता पाटील उपस्थित होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 305 crore development work sanctioned ssh

ताज्या बातम्या