करोना काळात अनेक नियम व अटींमुळे मोठ्या धुमधडाक्यात आणि उत्साहात गणेशोत्सव साजरा करू न शकलेल्या गणेशभक्तांनी यंदा त्या पोकळीची सर्व उणीव भरून काढल्याचे दिसून येत आहे. आगामी पालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन काही इच्छुक उमेदवारांनी गणेश विसर्जनाच्या निमित्ताने संपूर्ण प्रभागातून गणरायाची मिरवणूक काढली.

त्यामुळे विसर्जन स्थळी पोहचण्यासाठी पहाट उजडल्याचे चित्र होते. संध्याकाळी साडेआठच्या सुमारास पावसाचा जोर थांबला आणि मग गणेश भक्तांमध्ये उत्साह संचारला. वाशी सारख्या मध्यवर्ती ठिकाणी नवी मुंबई पालिकेच्या वतीने विसर्जनासाठी जाणाऱ्या प्रत्येक गणरायावर पुष्यवृष्टी केली जात होती. विशेष म्हणजे पुष्यवृष्टीची ही फुले पालिकेच्या वतीने तात्काळ उचलली जात होती. नवी मुंबईतील अनेक विसर्जन स्थळी पालिकेने निर्माल्य जमा करण्याची सोय केली होती. गेली दहा दिवस , दीड, पाच, सात, दिवसाच्या गणरायाचे विसर्जन झाले असून 26 टन निर्माल्य जमा झाले .

हेही वाचा : विसर्जन घाटावर ११ भावीकांना विजेचा झटका; पनवेलमधील मोठी दुर्घटना

त्यात शुक्रवारी दहाव्या दिवशी १० टनाची भर पडली असून ३६ ते ३७ टन निर्माल्य संपूर्ण नवी मुंबईतून जमा झाले असून त्याचे नैसर्गिक खत तयार केले जाणार आहे नेरुळ आणि कोपरखैरणे येथे काही सामाजिक संस्थांनी हे काम केले आहे. निर्माल्य पासून तयार झालेले खत पालिकेच्या उद्याना साठी वापरले जाणार असल्याचे उपायुक्त डॉ बाबासाहेब रांजले यांनी सांगितले.