पनवेल : नवी मुंबईमध्ये बालिका आणि महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे. मागील तीन वर्षांत ३८ महिलांच्या हत्येच्या घटना घडल्या. याच कालावधीत अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या ३७७ घटना घडल्या तसेच विविध कारणांवरून ४० महिलांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

मागील तीन वर्षांतील महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणाऱ्या टोळीला अद्याप पोलीस पकडू शकले नाहीत. त्यामुळे शहरात महिला खरेच सुरक्षित आहेत का, असा प्रश्न पडला आहे. २०२३ या मागील वर्षी १७ महिलांनी आत्महत्या केल्याची नोंद नवी मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांत झाली.

नवी मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाण्यात महिलांच्या समुपदेशनासाठी एक महिला पोलीस अधिकारी नेमली आहे. पोलीस निरीक्षक महिला पोलीस अधिकाऱ्यांची संख्या कमी असली तरी साहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर महिला पोलीस अधिकारी उपलब्ध आहे. तसेच बेलापूर येथे महिलांचे समुपदेशन व कायदेशीर सल्ला देण्यासाठी केंद्र सुरू आहे. मात्र कौटुंबिक हिंसेच्या प्रकाराला सामोरे जाणाऱ्या पीडित महिला या केंद्रापर्यंत पोहोचून त्यांच्यापर्यंत खरेच कायद्याचा सल्ला पोहोचतो का, असा प्रश्न आहे.

हेही वाचा – आधी फेसबूकवरून हायबाय, मग दिली तीन हजारांची ऑफर; तरुणीची थेट पोलीस ठाण्यात धाव, नेमकं काय घडलं?

मागील वर्षी ७०३ गुन्हे महिलांविषयक घडले. अनुचित प्रकार घडल्यास नवी मुंबईकरांनी ११२ या टोल फ्री क्रमांकावर फोन केल्यास पहिल्या सहा मिनिटांत फोन करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांची मदत मिळेल असा दावा नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी केला आहे. मात्र नवी मुंबईत पायी चालणाऱ्या महिलांच्या गळ्यातून मंगळसूत्र चोरणाऱ्यांना पोलीस जेरबंद करण्यात अपयशी ठरले आहे.

पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सूत्रे हाती घेतल्यावर महिला व ज्येष्ठांच्या सुरक्षेविषयी आश्वासित केले होते. त्यानुसार निर्भया पोलीस पथक प्रत्येक पोलीस ठाण्यात कार्यान्वित केले. होंडा दुचाकी आणि चारचाकी मोटारीतून महिला पोलीस कर्मचारी निर्भया पथकाव्दारे महिलांची मदत करणे हा त्यामागील उद्देश होता. मात्र सध्या त्या चारचाकी मोटारी रस्त्यावर कमी फिरताना दिसतात.

हेही वाचा – लोकलने धडक देऊनही दैव बलवत्तर म्हणून वाचला; वाशी स्टेशन मधील थरारक घटना सीसीटीव्हीत कैद 

याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या स्तरावर ‘सोशल इंजिनिअरिंग’चा अभ्यास करण्याची गरज आहे. मनोविकार तज्ज्ञ, समुपदेशक, मानसशास्त्रज्ञांच्या अभ्यासातून महिलांसाठी विशेष केंद्र चालविणे नवी मुंबईसारख्या आधुनिक शहराची गरज बनली आहे. यासंदर्भात पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महिलांसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात मदत कक्ष

प्रत्येक पोलीस ठाण्याच्या प्रवेशव्दारावर महिला पोलीस कर्मचाऱ्यांकडे पीडित महिला नि:संकोच तक्रार देऊ शकते यासाठी मदत कक्ष पोलीस आयुक्त भारंबे यांच्या सूचनेवरून सुरू केला. तसेच नेरुळ येथे सावली हे समुपदेशन केंद्र महिलांसाठी सुरू केले. हे सर्व स्वागतार्ह असले तरी नवी मुंबईतील सर्वाधिक कौटुंबिक हिंसेची प्रकरणे ज्या पोलीस ठाण्यात नोंदविली गेली, त्या पोलीस ठाण्याच्या परिसरातील सामाजिक स्थिती नेमकी काय आहे, याचे नेमके विश्लेषण अद्याप केले गेले नाही.