कळंबोली येथील सिंगसिटी रुग्णालय ते सेंट जोसेफ विद्यालयाच्या मार्गावर ‘स्वराज्य जय शिवराय मित्र मंडळ’च्या सदस्यांनी शिवजयंतीनिमित्त ४० फुटी भगवा झेंडा आडवा फडकवून छत्रपतींना शिवरायांना मानवंदना दिली आहे. या झेंडय़ाने कळंबोलीकरांचे लक्ष वेधून घेतले आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणतीही लोकवर्गणी या मंडळाच्या सदस्यांनी वसूल केलेली नाही. मंडळाच्या सदस्यांनी स्वताच्या खिशातून या झेंडय़ासाठीचे साडेपाच हजार रुपये जमवले आहेत.
कळंबोली येथील एलआयजीमधील सप्तश्रृंगी मातेच्या मंदिरासमोर दोन इमारतींच्या छताच्या वरच्या बाजूस हा झेंडा बांधण्यात आला आहे. या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी छत्रपतींसाठी ही मानवंदना असल्याचे सांगितले आहे. तसेच जागेअभावामुळे शहरी भागात झेंडा उभारण्यासाठी इतर ठिकाणे नसल्याने हा झेंडा शिवाजींच्या शौर्यगाथेप्रमाणे भलामोठा उभारल्याचे स्पष्ट केले आहे. अनेक राजकीय पक्ष विविध थोर पुरुषांच्या जयंत्या साजऱ्या केल्यानंतर रस्त्याकडील पथदिव्यांच्या खांबांना लावलेले झेंडे काढायचे विसरून जातात. मात्र या मंडळाचे अध्यक्ष शेखर सूर्यवंशी यांनी शिवजयंतीच्या दुसऱ्याच दिवशी हा झेंडा उतरवण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे हल्ली मुंबई, कुर्ला, पुणे येथील नवीन पद्धतीप्रमाणे रस्त्याच्या मधोमध दोन इमारतींना समोरासमोर झेंडा आडवा बांधण्याची नवी पद्धत पनवेलच्या सिडको वसाहतींमध्ये रुजली आहे. मात्र या झेंडा आडवा करण्याची भविष्यात स्पर्धा लागल्यास या झेंडय़ाचे एक टोक रस्त्यांवरील वाहनांना लागेल अशी भीती वाहनचालकांना वाटू लागली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 26th Mar 2016 रोजी प्रकाशित
४० फुटी झेंडय़ाद्वारे शिवरायांना मानवंदना
सप्तश्रृंगी मातेच्या मंदिरासमोर दोन इमारतींच्या छताच्या वरच्या बाजूस हा झेंडा बांधण्यात आला आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 26-03-2016 at 02:04 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 40 feet of saffron flag on occasion of shiv jayanti