नवी मुंबई : विदेशात खासकरून युरोप आणि सिंगापूर येथे स्वस्तात पर्यटनाच्या नावाखाली १९ जणांची ३९ लाख ७ हजार ७४ रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात संबंधित एजन्सी चालक-मालक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात १९ जणांनी फिर्याद दिली असली तरी ती संख्या वाढू शकते. ज्यांची फसवणूक झाली त्यांनी वाशी पोलिसांशी संपर्क करून तक्रार द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. विकी ऊर्फ भूपेश ठक्कर असे यातील आरोपीचे नाव आहे.
हेही वाचा – पनवेल प्रारूप विकास आराखड्यावर सुमारे सहा हजार हरकती-सूचना
विकीने वाशीतील हावरे फँटसीया पार्क या व्यावसायिक इमारतीत ट्रॅव्हल्स एक्स्प्रेस नावाची एजन्सी सुरू केली. विदेशात हवे तिथे पर्यटन करा आम्ही सर्व सोय करतो अशा आशयाची जाहिरात समाजमाध्यमातून केली होती. त्याला बळी पडून अनेकांनी युरोप-अमेरिका-सिंगापूर येथे पर्यटनाला जाण्यासाठी बुकिंग केले. मात्र जेव्हा तिकीट आणि हॉटेल बुकिंग पावती व इतर आवश्यक कागदपत्रे घेण्यासाठी पर्यटक आले, त्यावेळी सुरुवातीला कारणे सांगून टाळण्यात आले. मात्र काही दिवसांपूर्वी कार्यालयास टाळे लावून आरोपी पळून गेला. हे जेव्हा बुकिंग केलेल्या लोकांना कळले, त्यावेळी त्यांनी वाशी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या. यात मुख्य तक्रार नवीन ठक्कर या ज्येष्ठ नागरिकांच्या नावे नोंद करण्यात आली आहे. त्यांच्याप्रमाणेच अन्य १८ असे एकूण १९ जणांची ३९ लाख ७ हजार ७४ रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रमेश पाटील हे तपास करीत आहेत. ट्रॅव्हल्स एक्स्प्रेस एजन्सीमार्फत कोणी बुकिंग केले असेल तर वाशी पोलीस ठाण्याशी संपर्क करावा, असे आवाहन वाशी पोलिसांनी केले आहे.