समजायला लागल्यापासून इंजिनीअर बनण्याचा ध्यास उराशी बाळगणारे ७० वर्षीय सुरेश डोळ यांनी इलेक्ट्रिक मोटार क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. डोळ यांना या क्षेत्रातील निष्णातांनी मोटारींचे ‘डॉक्टर’ ही उपाधी दिली आहे. घरची आर्थिक परस्थिती बेताचीच असलेल्या डोळ यांनी सिमेन्स या इलेक्ट्रिक उत्पादनातील दादा कंपनीसाठी आतापर्यंत चक्क ९४ हजार मोटार बनवून दिलेल्या आहेत. त्यासाठी गुणवत्ता, पारदर्शकता आणि वेळेचे नियोजन हे गुण उपयोगी ठरले. अवघ्या ४०० रुपयांच्या बळावर सुरू झालेल्या या उद्योगाची उलाढाल आज शंभर कोटींच्या वर आहे. उद्योगाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या समूहाने आपल्याच २५० कामगारांच्या अडीअडचणीला धावून जाण्याचा वसा एका सामजिक संस्थेच्या माध्यामातून सांभाळला आहे. आयुष्यात एकदा ध्येय निश्चित केले की यश नक्कीच मिळते याचे उत्तम उदाहरण म्हणजे सुरेश डोळ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

[jwplayer 9AX3hgPE]

देश स्वातंत्र होण्यापूर्वी महाबळेश्वरला डोळ यांचा जन्म झाला. लहानपणीच वडिलांचे कृपाछत्र हरवल्याने त्यांना महाबळेश्वरला अलविदा करून मालेगावला मामाकडे उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण करावे लागले. लहानपणापासून इलेक्ट्रिक क्षेत्राकडे कल असणाऱ्या डोळ यांनी जुनी मॅट्रिक पूर्ण केल्यानंतर अभियंता होण्याचे स्वप्न घरात बोलून दाखविले. त्यासाठीचे वार्षिक ३०० रुपयांचे शुल्क कोण भरणार, असा प्रश्न विचारला गेला. शिक्षणाला पैसे लागतात याची जाणीव त्यांना तेव्हा प्रथमच झाली. त्यामुळे उच्च शिक्षण हे आपले काम नाही अशी खूणगाठ मनाशी बाळगून दहावीच्या जोरावर एखाद्या कंपनीत आयटीआय प्रशिक्षणार्थी म्हणून काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. थेट चंदिगड गाठले. वय वर्षे केवळ १६ असलेला हा अल्पवयीन मुलगा त्या वेळी दिल्लीपर्यंत रेल्वे आणि त्यांनतर बस प्रवास करून चंदिगडला पोहोचला.

तेथे मुलाखतीची तारीख उलटून गेल्याचे सांगण्यात आले. खूप मोठी निराशा पदरात पडली. पुढे कसे होणार या विवंचनेत असताना परतीच्या प्रवासात मोठय़ा बहिणीची विचारपूस करण्यासाठी ते अजमेरला उतरले. राजस्थान सारख्या अमराठी राज्यात एखादा आपला माणूस सोबत राहिला तर चांगले होईल असा विचार करून बहिणीच्या पतीने तिथेच राहण्याची गळ घातली. जीवनाला कलाटणी देणारे शिक्षण त्यांना अजमेरमध्ये मिळाले. इलेक्ट्रिकमध्ये आयटीआय पूर्ण करून एका नातेवाईकांच्या माध्यमातून ते मुंबईत आले आणि वरळीच्या सिमेन्स कंपनीत कामाला लागले.

दिवसांचे चार रुपये मानधन मिळणाऱ्या या कंपनीत डोळ यांनी १३ वर्षे काम केले. १३ वर्षांनंतर त्यांनी नोकरीला रामराम केला. तोपर्यंत इलेक्ट्रिक मोटारच्या समस्या सोडवण्यात त्यांनी हातखंडा मिळवला होता. मर्यादित शिक्षणामुळे पदोन्नतीलाही मर्यादा राहणार असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. ठाण्यात एका मित्राने तीन बाय तीनची जागा व्यवसायासाठी दिली. व्यावसायिक होण्याचे लक्ष समोर असल्याने त्याच क्षेत्रातील व्यक्तींशी ओळख वाढवली. त्याचा उपयोग नंतर व्यवसायवृद्धीसाठी झाला.

सिमेन्ससारखी प्रथितयश कंपनी सोडून व्यवसाय करण्याच्या त्यांच्या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण ध्येय स्पष्ट असल्याने आणि जबरदस्त आत्मविश्वास असल्याने डोळ समूहाने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.

रबाळे एमआयडीसीत तीन कंपन्या

डोळ समूहाच्या आज रबाळे एमआयडीसीत तीन कंपन्या आहेत. सव्‍‌र्हिस इंड्रस्ट्रीशी संबंधित व्यवसायाने १० वर्षांपूर्वी इलेक्ट्रिक मोटार उत्पादनात पाऊल ठेवले आणि हा व्यवसाय आज भरारी घेत आहे. केवळ सिमेन्ससाठी या कंपनीने ९४ हजार मोटार बनविल्या असून एक-दोन हॉर्स पॉवरच्या मोटार दुरुस्त करणारा हा व्यवसाय आता पंधरा हजार हॉर्स पॉवरपेक्षा जास्त क्षमतेच्या मोटार दुरुस्त करीत आहे. त्यामुळे सेवा आणि उत्पादन या दोन्ही पातळ्यांवर समूहाने घोडदौड कायम ठेवली आहे.

[jwplayer PuSvtqP8]

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 70 year old suresh dhol create impression in the field of electric motor
First published on: 23-11-2016 at 04:25 IST