तळोजा औद्योगिक क्षेत्रातील डांबर बनविणाऱ्या टीकीटार कंपनीला शनिवारी रात्री साडेदहा वाजता आग लागली. या आगीत ८ कामगार जबर जखमी झाले असून, त्यांच्यावर ऐरोली येथील बर्न्‍स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ८ पैकी ५ कामगारांची प्रकृती चिंताजनक असून आगीत टीकीटार ही कंपनी खाक झाली आहे.
डांबर बनविताना शनिवारी रात्री अचानक डांबराने पेट घेतल्याने ही आग कंपनीभर पसरल्याचे या कंपनीतील कामगारांनी पोलिसांना सांगितले. संजय म्हात्रे, आनंद सपकाळ, पवन साने, संजीब सिंग, राहुल सिंग, सुनील बोरो, टुनटुन सिंग व अखिलेश गुप्ता अशी जखमी कामगारांची नावे आहेत. एमआयडीसी आणि सिडकोच्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी रात्रभर प्रयत्न केल्यानंतर ती आटोक्यात आली. जवळच्या दोन कंपन्यांनी अग्निशमन दलाला पाणी दिल्याने आग लवकर विझली.