नवी मुंबई : वाशीतील रघुलीला मॉल परिसरात वाढदिवस साजरा करीत असताना अचानक दोन युवक आले आणि एका युवकावर चाकूचे सपासप वार करणे सुरु केले. यात त्याला वाचवण्यास आलेल्या मित्रावरही वार केले. घटना कळताच वाशी पोलिसही काही मिनिटात घटनास्थळी येऊन धाडसाने आरोपींना जेरबंद केले. पोलीस वेळेवर आले नसते तर एका युवकाची हत्या झाली असती. 

हसन सिद्दीकी, आणि युसूफ शहा असे अटक आरोपींचे नावे आहेत. यातील फिर्यादी सुभम हाजीज सरवैया हे मंगळवारी (१५ ऑगस्ट) रघुलीला मॉल येथे वाढदिवस साजरा करण्यासाठी मित्रांच्या समवेत आले होते. त्यावेळी रात्री एकच्या सुमारास  दोन्ही आरोपी एका कार मधून आले आणि त्यांनी  सुभम हाजीज  सरवैया याचा मित्र निजामोद्दीन खान  याला बेदम मारहाण करीत चाकूने सपासप वार केले.निजामोद्दीन याला वाचवण्यातही त्याचा अन्य मित्र रघुराम पै याने प्रयत्न केले मात्र त्याच्यावरही चाकूने वार करून जखमी केले.या घटनेविषयी कळताच पोलीस उपनिरीक्षक निलेश बारसे हे पथकासह घटनास्थळी दहा मिनिटात पोहचले. त्यावेळी आरोपी निजामोद्दीन याच्यावर वार करीतच होते. पोलीस आल्याचे पाहून आरोपींनी पोलिसांनाही दाद न दिल्याने शेवटी धाडस करून बंदुकीचा धाक दाखवून दोघांना पोलिसांनी पकडले. त्यांच्या कडून चाकू हस्तगत केले.एकंदरीत आरोपींची अवस्था पाहता कुठला तरी नशा त्यांनी केला असावा त्यामुळे ते एवढे बेफान झाले असावेत असा अंदाज हि व्यक्त करण्यात आला. 

हेही वाचा >>>पनवेल : स्वातंत्र्य दिनानिमित्त भाजपची तिरंगा दुचाकीफेरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपीच्या नातेवाईक मुलीचे आणि निजामोद्दीन यांचे प्रेम संबंध होते. या रागातून हा हल्ला केल्याचे प्राथमिक आरोपींशी केलेल्या चौकशीत समोर आले आहे.या प्रकरणात दोन्ही आरोपींच्याकडील दोन चाकू,गुन्ह्यात वापरलेली दहा लाख रुपयांची होंडा सिटी गाडी आणि चप्पल असा दहा लाख एकशे पन्नास रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.निजामोद्दीन गंभीर जखमी असून रघुराम पै आणि निजामोद्दीन यांच्यावर उपचार सुरु आहेत.