दररोज सात ते आठ हजार जणांना लसमात्रा

नवी मुंबई : ‘ताप’ नको म्हणून दिवाळीपूर्वी लसीकरणाकडे पाठ फिरवलेल्या नवी मुंबईकरांना आता लसीकरण केंद्रांवर गर्दी केल्याचे चित्र आहे. दररोज तीन हजारांपर्यंत खाली आलेले लसीकरण आता सात ते आठ हजारांपर्यंत होत आहे. महापालिकेने रेल्वे स्थानके व घरापर्यंत लसीकरण  सुविधा दिल्याने यात आणखी वाढ होणार आहे.

नवी मुंबईत १८ वर्षांवरील लसपात्र नागरिकांची संख्या ११ लाख ७ हजारांपर्यंत आहे. या सर्व पात्र नागरिकांना पहिल्या लसमात्रेचे सुरक्षा कवच मिळाले आहे. असे असले तरी आजही पहिल्या मात्रेचे लसीकरण सुरू असून ११ लाख ३५ हजार २९७ जणांना पहिली मात्रा तर ६ लाख ५० हजार ९४० जणांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. यात महापालिका प्रशासनाबरोबर खासगी रुग्णालयांचाही तेवढाच वाटा आहे.

दिवाळीपूर्वी दैनंदिन लसीकरण ३ हजारांपर्यंत खाली आले होते. ३१ ऑक्टोबर रोजी तर फक्त १ हजार १७ जणांचे लसीकरण झाले होते. त्यामुळे पालिका प्रशासनापुढे चिंता होती. पहिल्या मात्रेचे लसकवच दिले असले तरी दुसरी मात्रा आतापर्यंत

६ लाख ५० हजार ९४० जणांनानीच घेतली आहे. ही संख्या टक्केवारीत ५८ टक्केच्या आसपास असून गेले काही दिवस यात वाढ झालेली नव्हती. दिवाळीनंतर नागरिकांनी लस घेण्यास येत असून ८ नोव्हेंबर रोजी ९७६० जणांचे लसीकरण झाले आहे. आता दररोज ८ ते ९ हजार जणांचे लसीकरण होत आहे. यात आणखी वाढ होणार आहे.

दिवाळीनंतर पुन्हा एकदा लसीकरणास चांगला प्रतिसाद मिळत आहे. रेल्वे स्थानक तसेच प्रत्येक घरापर्यंत जाऊन लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्याचे काम केले जात असल्याने लसीकरणाची संख्या वाढली आहे.

डॉ. रत्नप्रभा चव्हाण, लसीकरण प्रमुख