अल्पवयीन मुलांच्या अपघातांत वाढ
उरण तालुक्यात महागडय़ा दुचाक्यांचे प्रमाण कमालीचे वाढले असून या अतिवेगवाग गाडय़ा चालविणाऱ्या अल्पवयीन मुलांचे अपघात होण्याचे प्रकारही वारंवार घडत आहेत. यात काही अल्पवयीन मुलांचा बळीही गेला असून मुलांचे लाड करणारे व त्यांच्या अवाजवी मागण्या पूर्ण करणारे पालकही यास जबाबदार असल्याची चर्चा सुरू आहे.
आम्ही जे उपभोगू शकलो नाही, ते आमच्या मुलांना मिळाले तर काय हरकत आहे, असा युक्तिवाद या पालकांकडून केला जातो, मात्र त्यामुळे पादचाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. महागडय़ा व अतिवेगवान दुचाकी कर्णकर्कश्श आवाज करीत चालवणाऱ्या या मुलांमुळे बाजारातील ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच पादचारी यांना कमालीचा मन:स्ताप होत आहे. या मुलांपैकी काही जण तर शालेय विद्यार्थी असल्याचे दिसते. विशेष म्हणजे वाहतूक पोलीसही त्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. या गाडय़ांवरून डबल सीटच नव्हे तर तीन-चार मुलेही एकाचवेळी जात असल्याने अपघातांचा धोकाही वाढत आहे.
उरणमध्ये औद्योगिकीकरणामुळे आलेली समृद्धीही यास कारणीभूत आहे. आपल्या मुलांसाठी लाख सव्वालाखाची दुचाकी घेणे अनेक पालकांना सहजसोपे वाटते. त्यामुळे अनेक दुचाकींवर डॅड्स गिफ्ट असे गर्वाने लिहिलेले असते, त्यातूनच वेगाची स्पर्धा होते. उरणमधील काही विद्यालयांनी विद्यार्थ्यांना दुचाकी वापरण्यास बंदी घातलेली असली तरी विद्यालयापासून काही अंतरावर दुचाकी लावून शाळेत येण्याची शक्कल काही विद्यार्थी लढवतात. दरम्यान, गाडय़ा उडवणाऱ्या अल्पवयीन मुलांवर कारवाई करण्यात आली आहे, तसेच शाळा व महाविद्यालयांमध्ये जाऊन त्यांचे प्रबोधनही करण्यात येत आहे, असे उरण वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक किशोर जगताप यांनी सांगितले.