पनवेल ः खारघर येथील अश्वमेध महायज्ञावरुन घरी परतण्यासाठी तीन आसनी रिक्षातून प्रवास करताना झालेल्या अपघातामध्ये एका नऊ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी दुपारी पावणेदोन वाजता पेठपाडा मेट्रो स्थानकाजवळ घडली. क्षमतेपेक्षा अधिक अवैध वाहतूकीमुळे या अपघातामध्ये हा बळी गेल्याची चर्चा आहे. 

हजारोंच्या संख्येने गायत्री परिवाराच्या अश्वमेध महायज्ञासाठी भाविक खारघरमध्ये आले होते. राज्यातील व उपनगरातील ठिकठिकाणांहून हे भाविक खारघरमध्ये येजा करण्यासाठी अनेकांनी खासगी वाहतूकीचा वापर केला तर मोठ्या प्रमाणात तीन आसनी रिक्षातून क्षमतेपेक्षा अधिकची वाहतूक करुन भाविक महायज्ञापर्यंत पोहचत होते. रविवारी दुपारी घडलेल्या महायज्ञाच्या गेट क्रमांक चार येथील अपघातामध्ये तीन जण जखमी आणि एका बालकाचा मृत्यू झाला. जखमींवर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सूरु आहेत. मृत बालकाचे नाव दिब्यप्रसाद नायक असे आहे. नायक कुटूंबिय महायज्ञासाठी सकाळी साडेसहा वाजता भिवंडी येथून खारघर येथे आले होते. दुपारी यज्ञात आहुती वाहिल्यानंतर ते घरी परतण्यासाठी तीन आसनी रिक्षातून जात असताना रिक्षामध्ये क्षमतेपेक्षा अधिकचे प्रवासी असल्याने रिक्षा चालकाचा रिक्षावरील ताबा सुटून रिक्षा दुभाजकावर आदळली.

हेही वाचा >>>खांदेश्वर येथे आठ वर्षांच्या बालकावर अत्याचार

 या अपघातामध्ये दिब्यप्रसाद याचा मृत्यू झाला तर दिब्यप्रसादची आई मंजुक्ता नायक या गंभीर जखमी झाल्या. मंजुक्ता यांच्यासोबत या रिक्षातील अन्य दोन प्रवासी जखमी असल्याचे पोलीसांनी सांगीतले. या प्रकरणी पोलीसांनी २८ वर्षीय रिक्षाचालक सतीष उतेकर याच्यावर हलगर्जीपणा रिक्षा चालविल्यामुळे गुन्हा नोंदविला आहे. खारघर येथे अश्वमेध महायज्ञाच्या ठिकाणी पाच दिवस हजारोंच्या संख्येने भाविक खारघरमध्ये दाखल होत होते. वाहतूक पोलीसांचा बंदोबस्त येथे होता. तरी क्षमतेपेक्षा अधिकची अवैध वाहतूक येथे सूरु होती. प्रादेशिक परिवहन विभागाचे कर्मचारी व वाहतूक विभागाच्या पोलीसांनी वेळीच लक्ष दिले असते तर हा अपघात टळू शकला असता अशी चर्चा परिसरात आहे. खारघरमध्ये आजही क्षमतेपेक्षा अधिकची अवैध वाहतूक रेल्वेस्थानक ते तळोजा या पल्यावर तीन आसनी रिक्षा आणि इकोव्हॅनमधून सूरु आहे.