नवी मुंबई : नवी मुंबईत बेकायदा राहणाऱ्या विदेशी नागरिकांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. अशाच कारवाईत बनावट कागदपत्रे बनवून तळोजा येथे राहणाऱ्या महिलेवर कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाई नवी मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेने केली आहे.
युगांडा देशाची महिला नागरिक ज्युलिएट नाकयेयूने ( Ms. Juliet Kirabo Nakyeyune) या अली अपार्टमेंट, फ्लॅट नं २०२, सेक्टर १७, तळोजा फेज २ नवी मुंबई, येथे बेकायदा वास्तव्य करीत असल्याची माहिती मिळाली होती. या अनुषंगाने विशेष शाखा परदेशी नागरिक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. विशाल माने व पथकाने सदर ठिकाणी भेट देऊन चौकशी केली असता मूळ युगांडा येथील रहिवासी बिइरा रोज (Ms. Biira Rose,) हिनेच ज्युलिएट हिच्या वैयक्तिक माहितीचा वापर करून व स्वतःचा फोटो वापरून ती ज्युलिएट असल्याचे भासवू न ऑनलाईन सी फॉर्म वर खोटी माहिती भरून शासनाची दिशाभूल केल्याचे समोर आले. वास्तविक तिच्या स्वतःच्या व्हिसाची मुदत पाच जानेवारी २०१७ मध्येच संपली होती. मात्र तरीही ती भारतामध्ये बेकायदा वास्तव्य करत होती. सदर महिलेस अटक करण्यात आली असून न्यायालयाने ३ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास तळोजा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गोरे हे करत आहेत.