‘माझी बदनामी करणाऱ्यांना सोडणार नाही’ | Loksatta

‘माझी बदनामी करणाऱ्यांना सोडणार नाही’

२५ वर्षांत पहिल्यांदा शिवसेनेने रायगड जिल्ह्य़ात स्वबळाचा नारा दिला.

‘माझी बदनामी करणाऱ्यांना सोडणार नाही’
आदेश बांदेकर

आदेश बांदेकरांचा उरणमध्ये इशारा

पनवेल पालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या नेत्यांवर ज्यांनी खोटे व चुकीचे आरोप केले त्यांना मी सोडणार नाही, असा इशारा आज शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर यांनी दिला. उरण येथील आमदार मनोहर भोईर यांच्या वाढदिवसाच्या सोहळ्यातील भाषणात बांदेकर यांनी हा इशारा दिला. पालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या वाटय़ाला पराजय आल्यानंतर शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांच्या पुत्रांनी समाजमाध्यमांवर बांदेकर यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांशी हातमिळवणी करून भ्रष्टाचार केल्याच आरोप केला होता. या आरोपाचा समाचार घेताना बांदेकरांनी हा इशारा दिला आहे.

२५ वर्षांत पहिल्यांदा शिवसेनेने रायगड जिल्ह्य़ात स्वबळाचा नारा दिला. पनवेल पालिकेच्या निवडणुकीत सेनेच्या उमेदवारांना ६९ हजार मते पडली. या निवडणुकीनंतर शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर यांच्यावर काही तरुण शिवसैनिकांनी समाजमाध्यमांवर जोरदार टीका सुरू केली. शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांच्याशी बांदेकर यांच्या मैत्रिपूर्ण नात्यावर बोट ठेवत निवडणुकीत मिळालेल्या पैशाने बांदेकर यांनी फोच्र्युनर कार घेतल्याचे संदेश पसरविण्यात आले. मागील अनेक दिवसांपासून यावर कोणतीही प्रतिक्रिया बांदेकर यांनी दिली नव्हती. अखेर उरणचे आमदार मनोहर भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या जाहीर कार्यक्रमात बांदेकर यांनी मौन सोडत याबाबत नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याशी याबाबत आपली चर्चा झाली असून हा संदेश ज्याने पसरवला आहे त्याला पोलीस शासन करतील, असे जाहीर केले.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-06-2017 at 04:42 IST
Next Story
‘चकाचक नवी मुंबई’साठी सज्ज व्हा!