शिवसेनेच्या दाव्यामुळे गणेश नाईक, मंदा म्हात्रे गटाची चलबिचल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई : बेलापूरचा किल्ला काबीज करण्याच्या उद्देशाने भाजपमध्ये गेलेले माजी मंत्री गणेश नाईक व बेलापूरमध्ये आपल्याशिवाय आहे कोण, असा ठाम विश्वास असलेल्या विद्यमान आमदार मंदा म्हात्रे या शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांच्या ‘विधानसभा निवडणुकीनंतर विजयी मेळाव्यासाठी पुन्हा येईन’ या वक्तव्यावर भाजपचे नाईक व म्हात्रे हे इच्छुक उमेदवार हवालदिल झाले आहेत. राज्यात युती झाल्यास शिवसेना बेलापूरवर दावा ठोकणार हे यामुळे जाहीर झाले आहे. भाजपच्या वाटय़ाला जाणाऱ्या ऐरोली मतदारसंघात ठाकरे यांनी फक्त सभा घेतली.

शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे हे सध्या जन आशीर्वाद यात्रेद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधत आहेत. सोमवारी ते नवी मुंबईत होते. त्या वेळी त्यांनी जनतेशी संवाद साधला. पालकमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई झोपडपट्टी सुधार समितीचे सभापती विजय नाहाटा यांच्यासह नवी मुंबईतील अनेक पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत नवी मुंबईकरांनी खासदार राजन विचारे यांना दिलेल्या मोठय़ा मताधिक्यामुळे मतदारांचे आभार मानण्यासाठी आलो असल्याचे या वेळी ठाकरे यांनी स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीनंतर विजयी मेळाव्यासाठी पुन्हा नवी मुंबईत येईन, असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले. त्यामुळे राज्यात युती झाल्यास शिवसेना नवी मुंबईतील दोन मतदारसंघांपैकी बेलापूर या मतदारसंघावर दावा ठोकणार हे स्पष्ट झाले आहे. सध्या शिवसेनेत उमेदवार निवड प्रक्रियेत आदित्य ठाकरे यांच्या मताला किंमत आहे. त्यामुळे ठाकरे यांनी दिलेल्या संकेताने शिवसैनिकांत उत्साह संचारला आहे. युतीत नवी मुंबईतील दोन्ही जागा भाजपला दिल्यास नवी मुंबईतील शिवसेनेचे अस्तित्व संपुष्टात येईल ही बाब येथील नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पटवून सांगितली आहे. त्यामुळे शिवसेना बेलापूरचा किल्ला आपल्यासाठी राखून ठेवणार असे स्पष्ट दिसून येत आहे.

बेलापूर मतदारसंघ शिवसेनेच्या वाटय़ाला गेल्यास त्याचा सर्वाधिक फटका विधानसभेच्या तोंडावर भाजपमध्ये गेलेले माजी मंत्री गणेश नाईक यांना बसणार आहे. गेली २५ वर्षे पालिकेवर एकहाती सत्ता टिकवणाऱ्या नाईक यांना ठाणे जिल्ह्य़ाचे नेतृत्व म्हणून भाजपने स्वीकारले आहे. त्यासाठी त्यांचे सरकारमध्ये पुनर्वसन करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. ठाणे व कोकणात पक्ष वाढविण्याचे आदेश राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी नुकतेच दिलेले आहेत.

युतीच्या तहात बेलापूरचा किल्ला शिवसेनेला गेल्यास नाईक यांच्या भाजपप्रवेशाचा उद्देशच फोल ठरणार आहे. विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांच्या रूपात भाजपच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ भाजप सहजासहजी सोडणार नाही; पण युती टिकविण्यासाठी म्हात्रे यांचा बळी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे भाजपचे नाईक आणि म्हात्रे हे दोन नेते ठाकरे यांच्या सूचक वक्तव्याने चांगलेच हवालदिल झाले आहेत.

विशेष म्हणजे नाईक यांचे चिरंजीव माजी आमदार संदीप नाईक यांच्यासाठी सोडण्यात आलेलेल्या ऐरोली मतदारसंघात ठाकरे यांनी रॅली न काढता एका सभागृहात शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.

मी बेलापूर मतदारसंघाची भाजपची आमदार आहे. बेलापूर मतदारसंघ लढवण्याबाबत कोणी वक्तव्य केले असले तर या ठिकाणी लोकशाही असल्यामुळे कोणीही आपले मत मांडू शकतो.

– मंदा म्हात्रे, आमदार, बेलापूर मतदारसंघ

आम्ही शिवसैनिक आहे. आदित्य ठाकरे यांनी बेलापूरला शिवसेनेचाच भगवा फडकणार, असे सांगितले आहे. ते आदेश देतील त्याप्रमाणे काम करणार असून तयारी सुरू आहे.

– विजय नाहटा, उपनेते शिवसेना

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditya thackeray says shiv sena to claim belapur belapur constituency zws
First published on: 18-09-2019 at 02:34 IST