पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये कोरोनाचे तीन संशयीत रुग्ण आढळल्याने पालिका प्रशासनाने तातडीने बैठक घेऊन विविध तीन रुग्णालयांमध्ये दोनशे खाटांचे विलगीकरण कक्ष उभारण्याची तयारी पालिका प्रशासनाने सुरू केली. तसेच रविवारी झालेल्या बैठकीत पनवेल महापालिका क्षेत्रातील सर्व संबंधित यंत्रणांनी सज्ज राहण्याचे आदेश महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी दिले. यावेळी पालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ. वैभव विधाते आणि आरोग्य व स्वच्छता विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
रोडपाली मध्ये एक आणि खारघर उपनगरामध्ये राहणारे दोन असे तीन रुग्ण कोरोना साथरोगाचे आढळले असून तीनही रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिकेचे उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी दिली. रोडपाली येथील सेक्टर १७ मध्ये राहणा-या ५९ वर्षीय महिला संशयीत कोरोनाचे रुग्ण आढळले असून त्यांच्यावर अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहे. तसेच खारघरमधील सेक्टर ३ मध्ये ५१ वर्षीय महिलेवर सीबीडी येथील एमजीएम रुग्णालयात आणि तीसरे रुग्ण खारघरमधील सेक्टर १४ येथे ७४ वर्षीय पुरुष असून त्यांच्यावर अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाढत्या रुग्ण संख्येमुळे पालिका आयुक्त चितळे यांनी कोरोना साथरोगावर तातडीने नियंत्रण कक्ष सुरू करण्याचे आदेश दिले. खारघर येथील वायएमटी वैद्यकीय महाविद्यालयाच्या निमिशा रुग्णालयात १०० खाटांचे कोरोना साथरोग रुग्णासाठी विलगीकरण कक्ष तसेच कळंबोली येथील पालिकेच्या रुग्णालयात ३० प्राणवायू खाटा आणि ६ खाटांचे अतिदक्षता विभागाची तयारी करण्याचे काम पालिकेने हाती घेतल्याची माहिती दिली. याचसोबत तसेच पनवेल शहरातील नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात ५० खाटा आणि कामोठे येथील एमजीएम रुग्णालयामध्ये ५० खाटा आरक्षित ठेवण्याबाबतच्या सूचना पालिका आयुक्तांनी बैठकीत दिल्या.
आयुक्तांच्या सूचनेननुसार संबंधित रुग्णालय व्यवस्थापनासोबत पत्रव्यवहार करण्यात आल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. पनवेल शहरातील पॅरामाऊंट रुग्णालयात इतर तालुक्यामधील एक रुग्ण कोरोना रोगावर उपचार घेत आहे. पालिकेच्या मोल एक्स्पर्ट या आरटीपीसीआर लॅबमध्ये दररोज दिडहजार आरटीपीसीआर चाचण्या करण्याची क्षमता असून या लॅबसाठी लागणारी आवश्यक रसायने पालिकेमध्ये उपलब्ध असल्याने ही लॅब पालिकेने सुरू केली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागात सहाशेहून अधिक मनुष्यबळ असल्याने कोरोना रुग्णांची तपासणी पालिका करु शकेल