झोपडपट्टीवासीयांना हाताशी धरून सर्वपक्षीय मोर्चा

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात आंदोलने, बंद आणि अविश्वास ठरावासह अन्य सर्व शस्त्रे निष्प्रभ ठरल्यानंतर आता सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी जनआंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे. ऐरोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्थानकाला मार्बल लावण्याचा मुख्य मुद्दा घेऊन आणि कारवाईमुळे बिथरलेले झोपडपट्टीवासीय व विद्यार्थी-शिक्षकांना हाताशी धरून शुक्रवारी सर्वपक्षीयांनी कोकण भवनावर मोर्चा काढला.

ऐरोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला मार्बलचे आच्छादन लावण्यास आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलेल्या विरोधाचे भांडवल करत २६ जानेवारीला आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. त्याची पालिका प्रशासनाने दखल न घेतल्याने शुक्रवारी कोकण भवन येथे मोर्चा काढण्यात आला. आरपीआयचे सिद्राम ओव्हळ, यशपाल ओव्हळ, महेश खरे, राष्ट्रवादीचे अनंत सुतार, जे. डी. सुतार शिवसेनेचे संजू वाडे यांनी महापौर सुधाकर सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढला. आंदोलनाचा एक भाग म्हणून कोकण भवन परिसरात हजारो नागरिक व शाळकरी मुले जमली होती.

शालेय वर्ष संपण्यास तीन महिने शिल्लक असताना विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले नसल्याच्या निषेधार्थ ‘भीक मांगो’ आंदोलन केले. या मागणीसाठी बेलापूर परिसरात ठिय्या देण्यात आला. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या मुद्दय़ावर ‘बघत काय बसलात,  रस्त्यावर उतरा’ असे आवाहन त्यांच्या नवी मुंबई भेटीदरम्यान केले होते. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर २६ जानेवारीला आंदोलन करण्यात आले, मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नाही. त्यामुळे अखेर कोकण भवनवर मोर्चा काढला.

दिघा येथे ‘वॉक विथ कमिशनर’अंतर्गत आयुक्तांनी भेट दिल्यानंतर सुरू झालेल्या धडक कारवाईमुळे धास्तावलेल्या झोपडपट्टीवासीयांनाही राजकीय पक्षांनी हाताशी धरल्याचे मोर्चात दिसून आले. त्यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहून ‘तुकाराम मुंढे हटाव’चा नारा दिला. मुंढे हे लोकशाहीची पायमल्ली करत असल्याचे नगरसेवक अंनत सुतार यांनी पत्रकारांना सांगितले.

मोर्चासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दिघा, रबाळे, तुर्भे परिसरांतील नागरिक प्रामुख्याने सहभागी झाले होते. आंदोलकांनी ‘मुंढे हटाव’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. कोकण महसूल आयुक्तांना निवेदन देऊन भविष्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आयुक्त जबाबदार राहतील, असा इशारा देण्यात आला.

सर्व अस्त्रे निष्प्रभ

तुकाराम मुंढे हे जाणीवपूर्वक आंबेडकर स्मारकाच्या विरोधात निर्णय घेऊन वातावरण कलुषित करत असल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला. झोपडय़ांवर, ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांवर आणि धार्मिक स्थळांवर कारवाई केली जात असल्याचा निषेध करण्यात आला. मुंढे यांच्या विरोधात यापूर्वीही ग्रामस्थांनी नवी मुंबई बंद केला होता. गणेश विसर्जनाच्या वेळी स्वयंसेवकांनी गणपती विसर्जन बंद करून आंदोलन केले होते. सर्वपक्षीय नगरसेवकांनी मुंढे यांच्यावर अविश्वास ठराव आणला आहे. हे सारे करूनही मुंढे यांना पदावरून हटवण्यास अपयश आल्याने हे आंदोलनाचे पाऊल उचलण्यात आले.