लोकसत्ता प्रतिनिधी

उरण : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळबाधितांनी आंदोलने केल्यानंतर पोलीस आणि प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जातात, मात्र त्यावर काहीही होत नाही. त्यामुळे विमानतळ बाधितांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. हक्क मिळविल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

रविवारी नवी मुंबई विमानतळबाधित प्रकल्पग्रस्तांची बैठक झाली.  यात वरील इशारा देण्यात आला. सिडकोला घेराव घालून महिना उलटला तरी कोणतीही बैठक घेण्यात आलेली नाही. याची जबाबदारी पोलिसांनी घेतली होती. मात्र त्यांनीही कोणतीच बैठक आयोजित केली नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष आहे. तर दुसरीकडे मागण्या मान्य केल्याची पत्रके सिडकोकडून प्रसिद्ध केली जात आहेत.

सिडकोकडून बाधित शेतकऱ्यांना सर्वोत्तम पॅकेज दिले असून त्यांचे प्रश्न मार्गी लावल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अनेक प्रकल्पग्रस्त त्यांच्या मूलभूत हक्कापासून वंचित आहेत. पुनर्वसन करीत असताना काहींना लाभ व अनेकजण त्यापासून वंचित असल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये संताप आहे.

वारंवार याची आठवण करून देऊनही केवळ प्रकल्पग्रस्तांवर अन्याय करण्याच्या हेतूने सिडकोकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप या बैठकीत करण्यात आला. साधी चर्चाही करण्याचे सौजन्य सिडकोकडून दाखविले जात नाही. मात्र आम्ही लढणारे आहोत. दि.बा. पाटील यांनी आपल्या हक्कांसाठी लढण्याचे हत्यार दिलेले आहे. त्यामुळे हक्क मिळविल्याशिवाय गप्प बसणार नाही असा निर्धार प्रकल्पग्रस्तांनी या बैठकीत केला असून येत्या काही दिवसांत एक मोठे आंदोलन जाहीर करणार असल्याची माहिती किसान सभेचे रायगड जिल्हा अध्यक्ष रामचंद्र म्हात्रे यांनी दिली.