सिडको दाद देत नसल्याने संताप; आंदोलनासाठी गावांत बैठका

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रकल्पग्रस्तांच्या मृतदेहाचे सिडको मुख्यालयासमोर प्रतीकात्मक दहन केल्यानंतरही सिडको प्रशासनाला जाग येत नसल्याने नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्त तीव्र आंदोलन उभारणार आहेत. त्यासाठी गावागावांत बैठका घेतल्या जात असून चौदा गावांतील प्रकल्पग्रस्त पुन्हा रस्त्यावर उतरणार आहेत.

नवी मुंबई विमानतळ प्रकल्पात विस्थापित होणाऱ्या १४ गावांपैकी चार गावांच्या काही समस्या अद्याप प्रलंबित आहेत. पावसाळ्यात डुंगी, कोंबडभुजे, पारगाव, चिंचपाडा या गावांत पाच ते सहा फूट पाणी साचले होते. प्रकल्पग्रस्तांना घरगुती गणेशोत्सवाचे मुदतीपूर्वी विसर्जन करावे लागले होते. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजी आहे. १४ गावांपैकी दहा गावांची ६७१ हेक्टर जमीन विमानतळ प्रकल्पासाठी संपादित केली जाणार असल्याने ही गावे दापोली, वडघर या गावांशेजारी स्थलांतरित केली जाणार आहेत. यात वरचा ओवळा, डुंगी, कोंबडभुजे, उलवा या गावांचा समावेश नव्हता. या गावांत पाणी साचल्याने आता त्या गावांनाही स्थलांतरित करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. सिडको या गावांच्या स्थलांतराबद्दल निर्णय घेताना काही सार्वजनिक व वैयक्तिक मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे या चार गावांतील प्रकल्पग्रस्तांनी आठ दिवसांपूर्वी बेलापूर येथील सिडको मुख्यालयासमोर प्रकल्पग्रस्तांचे प्रतीकात्मक मृतदेहाचे दहन केले, मात्र त्यानंतरही सिडको प्रशासन चालढकलपणा करीत आहे. प्रकल्पग्रस्तांच्या नेत्यांना चर्चेसाठी बोलाविले जात नाही. त्यामुळे चार गावांतील प्रकल्पग्रस्त तीव्र आंदोलन उभारण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी गावागावांत बैठका घेतल्या जात असून इतर दहा गावांतील प्रकल्पग्रस्तांचाही या आंदोलनाला पाठिंबा मिळणार आहे.

आठ दिवसांपूर्वी झालेल्या प्रतीकात्मक मृतदेह आंदोलनालाही आगरी कोळी समाजाच्या अनेक संघटनांनी पाठिंबा दिला होता. पनवेल उरण तालुक्यातील सर्व प्रकल्पग्रस्तांचा संभाव्य आंदोलनाला पाठिंबा मिळावा यासाठी बैठका घेतल्या जात आहेत.

नवी मुंबई विमानतळासाठी येथील प्रकल्पग्रस्तांनी नेहमीच सहकार्य केले आहे. सिडकोने कोअर क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतर केल्याने आता इतर प्रकल्पग्रस्तांबरोबर दुजाभाव केला जात आहे. पावसाळ्यात चार गावांतील स्थिती ही विदारक होती. विमानतळासाठी टाकण्यात आलेल्या मातीच्या भरावामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. त्यावर स्थलांतर हा तोडगा असून ते करताना सिडको सहकार्य करीत नाही. त्यामुळे तीव्र आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नाही. – महेंद्र पाटील, अध्यक्ष, नवी मुंबई विमानतळ शेतकरी संघर्ष समिती

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Airport project invader akp
First published on: 23-11-2019 at 00:41 IST