नवी मुंबई : मालेगाव स्फोट प्रकरणात न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केल्यानंतर काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यावरून राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला उधाण आले आहे. ‘भगवा दहशतवाद’ या संज्ञेवर चव्हाण यांनी आक्षेप घेत ‘हिंदू दहशतवाद’ किंवा ‘सनातन दहशतवाद’ असा शब्दप्रयोग करावा असे सुचवले. मात्र, त्यांच्या या वक्तव्याचा आता सर्व हिंदुत्ववादी संघटनांकडून तीव्र निषेध केला जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही चव्हाण यांच्या विधानाचा समाचार घेत स्पष्ट शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.

“आपण हिंदू राष्ट्रात राहतो. जगात अशी खूप कमी राष्ट्रं आहेत जी हिंदू राष्ट्रं आहेत. आपण जर स्वतःच्या धर्मालाच पाठिंबा देणार नाही, तर कोणाला देणार? प्राण्यांच्या नष्ट होत चाललेल्या प्रजातींचेही संवर्धन केले जाते, तर मग इथे उरलेल्या एकमेव हिंदू राष्ट्रात हिंदूंना जर दहशतवादी म्हटले तर कसं चालेल?” असा सवाल अमृता फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “आपला धर्म हिंदू आहे. आपण इतर धर्मांचाही आदर करतो. मात्र आपल्या धर्माबद्दल अभिमान असणे अत्यंत गरजेचे आहे.” अशा शब्दांत त्यांनी चव्हाण यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली.

अमृता फडणवीस यांच्या ‘दिव्याज फाउंडेशन’ तर्फे नवी मुंबईतील सानपाडा येथे शासकीय सुरक्षा रक्षकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना अमृता फडणवीस यांनी सध्या सुरू असलेल्या विविध घडामोडींवर आपली मते मांडली.

धार्मिक मुद्द्यांवरून ध्रुवीकरण थांबवा – फडणवीस यांचे आवाहन

यावेळी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धार्मिक मुद्द्यांवरून होणारे ध्रुवीकरण थांबविण्याचे आवाहन करत त्यांनी सांगितले की, वाचन, ध्यानधारणा आणि योगसाधना यासारख्या सकारात्मक उपक्रमांकडे वळल्यास समाज अधिक सशक्त होईल. असे त्यांनी सांगितले.

यवत प्रकरणीही स्पष्ट भूमिका

दौंड तालुक्यातील यवत गावात घडलेल्या तणावपूर्ण घटनेवरही अमृता फडणवीस यांनी भाष्य केले. “बाहेरून काही लोक महाराष्ट्रात येतात आणि समाजात अशांतता निर्माण करतात. हे राज्य शासनाने ओळखले असून त्यावर योग्य ती पावलं उचलली गेली आहेत,” असे त्या म्हणाल्या. त्यामुळे “यवत गावात हिंदू-मुस्लीम समाज एकत्र आला आणि शांतता प्रस्थापित झाली. याचा मला आनंद आहे आहे,” असे त्यांनी नमूद केले.

राज्याच्या राजकीय व सामाजिक पातळीवर सुरु असलेल्या चर्चांमध्ये या वक्तव्यामुळे आता नव्याने चर्चा रंगण्याची शक्यता आहे.