मंगोलिया, महाराष्ट्र भ्रमंतीनंतर दक्षिण अफ्रिकेकडे परतीचा प्रवास

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विकास महाडिक,लोकसत्ता

नवी मुंबई : जगभर भ्रमंती करणाऱ्या ससाणा प्रजातीतील अतिशय दुर्मीळ अमूर ससाणा या रंगीबेरंगी, रुबाबदार पक्षाचे दर्शन खोपोली टाटा पॉवर हाऊस श्रेत्रात गेली काही दिवस पक्षी प्रेमींना सुखावत आहे. शेकडो पक्षीप्रेमी आपले त्याची छबी टिपण्यासाठी कॅमेरे घेऊन भटकत आहेत.

नवी मुंबईच्या खाडीकिनारी गुजरातच्या कच्छ भागातून आलेल्या रोहित पक्ष्यांचे दर्शन डोळ्यांना सुखावणारे आहे. पक्षीप्रेमी या रोहित पक्ष्यांचे विविधरंगी रूप टिपण्यासाठी गर्दी करीत असल्याचे दिसून येते. मात्र यंदा पहिल्यांदाच खोपोली येथील टाटा पॉवर हाऊस परिसरात चपळ, वेगवान असणाऱ्या ससाणा प्रजातीतील अमूर पक्ष्याचे गेली दहा दिवस वास्तव असून तो पक्षीप्रेमींच्या कुतूहलाचा विषय झाला आहे.

नोव्हेंबर महिन्यात मंगोलिया देशातून निघालेला हा पक्षी आसाम, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, बांगलादेश, बंगालचा उपसागर, आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र आणि अरबी समुद्र असा प्रवास करून दक्षिण अफ्रिकेपर्यंत जात असल्याचे सॅटेलाइट टॅगिंगमुळे एका निरीक्षणात आढळून आले आहे. भारतात या पक्ष्याचा मुक्काम नागालँडमधील पंगाती गावात या पक्ष्यांचे काही काळ वास्तव्य असते. त्या ठिकाणी या पक्ष्याची शिकार होत होती. मात्र पक्षीप्रेमी संस्थांमुळे ही हे थांबले आहे. केवळ या पक्ष्यांना मारणेच थांबलेले नसून त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे देश-विदेशातील अनेक पक्षीप्रेमी या पक्ष्यांच्या दर्शनासाठी नागालँडमध्ये जात असल्याचे पक्षीप्रेमींनी सांगितले. मागील तीन वर्षांपासून हा पक्षी कोल्हापूरच्या माळरान व पठारांवर आढळून आला आहे. त्याची तशी नोंद येथील पक्षीप्रेमींनी केलेली आहे. हा पक्षी कोल्हापूर सोडून पहिल्यांदाच रायगड जिल्ह्य़ातील खोपोली या कर्नाळा अभयारण्य क्षेत्रात आलेला आहे. या भागात मिळणारे विशिष्ट प्रकारचे किडय़ांचे खाद्य या पक्ष्याला आकर्षित करीत आहे. खोपोलीहून अरबी समुद्र मार्गे  दक्षिण अफ्रिकेत मुक्तसंचार केल्यानंतर हा पक्षी एप्रिलपर्यंत परत फिरत असल्याचे पक्षीप्रेमी सांगतात. मंगोलिया ते दक्षिण अफ्रिका असा या पक्ष्याचा बावीस हजार किलोमीटरचा प्रवास होत असून सर्वाधिक संचार करणारा हा पक्षी म्हणून नोंद केली गेली आहे.

अमूर फाल्कन (ससाणा)चे खोपोलीत होत असलेले दर्शन मनाला आनंद देणारे आहे.  कोल्हापूरनंतर हा पक्षी खोपोलीत दिसून आल्याने मुंबई, नवी मुंबईतील पक्षीप्रेमींनी या पक्ष्याच्या अदा कॅमेराबद्ध केलेल्या आहेत.

नीलेश तांडेल, पक्षीप्रेमी 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amur falcons spotted near navi mumbai zws
First published on: 01-01-2021 at 01:26 IST