लोकसत्ता वार्ताहर
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने उत्पन्न वाढीसाठी कारवाई सुरू केली आहे. एक नवीन दक्षता पथक तयार करण्यात आले आहे. या दक्षता पथकाने गेल्या १० दिवसांत बाजार समितीचा बाजार फी न भरता मोठ्या प्रमाणात शेतमालाचा अनधिकृतपणे आयात करणाऱ्या आयातदारांवर कारवाई करून११ लाखाची दंड वसुली केली आहे.
समितीच्या सभापतीपदी प्रभू पाटील यांनी पदभार स्वीकारल्यापासून बाजार समितीच्या उत्पन्न वाढीसाठी ही कारवाई सुरू केली आहे. अनधिकृतपणे व्यापार करणारे आयातदार बाजार समितीच्या विना अनुज्ञप्ती शिवाय व्यवसाय करत होते. या आयातदारांच्या आणि व्यापाऱ्यांच्या, बाजार फी बुडवणाऱ्या गाड्या पथकाकडून पकडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या गाड्यांमध्ये मोठ्या कंटेनरचा समावेश आहे. या मालाची किंमत जवळपास ६ कोटींच्या घरात आहे. पथकाने पकडकेल्या वाहनामध्ये वेलची, लवंग, बासमती तांदूळ, चवळी, सूर्यफूल, नाचणी आणि राजमाचा समावेश असून आतापर्यंत जळपास ११ लाखाची दंड वसुली करण्यात आली आहे. यामुळे बाजार समितीच्या विना परवानगीने, मालाची आयात, निर्यात आणि किरकोळ व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये या दक्षता पथकाची दहशत निर्माण झाली आहे.
दक्षता पथकाच्या कारवाईची भीती व्यापाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे, आणि त्यामुळे त्यांचे धाबे दणाणले आहेत. या पथकामध्ये मुंबई बाजार समितीचे सचिव पी एल खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली उप सचिव महेश साळुंके पाटील ,अनंत पारदुले , संजय खांडेकर , अजित नारंगकर, विनीत उबाळे यांचा समावेश आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी अशा प्रकारे अनधिकृतपणे व्यापार, आयात आणि निर्यात करण्यापेक्षा बाजार समितीची अनुज्ञप्ती घेवून व्यापार करावा असे आवाहन सभापती प्रभू पाटील यांनी केले आहे .