नवी मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) दक्षता पथकाने विनापरवाना आणि सेस न भरता परदेशातून आयात करण्यात आलेल्या तूर डाळीच्या २०० कंटेनरवर मोठी कारवाई करत संबंधित आयातदारावर तब्बल १ कोटी ११ लाख ४८ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. गुरुवारी (२९ मे) रात्री मुंबई एपीएमसीच्या दक्षता पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे अनधिकृत शेतमाल व्यापार करणाऱ्या आयातदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

सदर तूर सुमारे ५,००० टन इतकी असून तिची एकूण अंदाजित किंमत ३४ कोटी ६० लाख रुपये आहे. ही तूर दुबई येथून मे. अग्ग्लो कमोडीटीस FZE या कंपनीमार्फत आयात करण्यात आली होती आणि ती मे. नमहा इम्पोर्ट्स, मुंबई यांच्या नावे नावाशेवा येथील एका गोदामात उतरवण्यात आली होती. मात्र, या आयातदाराकडे बाजार समितीचा परवाना नव्हता तसेच कोणतीही पूर्वपरवानगी घेतलेली नव्हती.

महत्त्वाचे ठळक मुद्दे :

बाजार समितीची पूर्व परवानगी आणि कोणत्याही परवान्याशिवाय बाजार समिती कार्यक्षेत्रात २०० कंटेनरमधून सुमारे ५,००० टन तूर आणली

बाजार समितीने १.११ कोटी रुपयांचा तीनपट दंड ठोठावला

तुरीची एकूण अंदाजित किंमत ३४.६० कोटी रुपये

एपीएमसीच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई

२९ मे रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास मुंबई एपीएमसीच्या दक्षता पथकाने जेएनपीटी, तुर्भे, नेरुळ, ठाणे-बेलापूर रोड आणि नवी मुंबई परिसरात अनधिकृत शेतमाल वाहतुकीवर लक्ष ठेवताना उरणमधील वहाळ फाट्याजवळ एका कंटेनरची तपासणी केली. एमएच-४८-टी-८१५६ क्रमांकाच्या वाहनात परदेशातून आलेली तूर असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यावर कारवाई करण्यात आली. चौकशीत या मालाची कोणतीही नोंद बाजार समितीत नसल्याचे आणि कोणताही सेस किंवा देखरेख शुल्क न भरल्याचे स्पष्ट झाले.

सदर प्रकरणात महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन विकास व विनियमन अधिनियम, १९६३ च्या कलम ३२ (९अ व ९क) अंतर्गत तीनपट दंडाची कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय बाजार फी, देखरेख खर्च आणि इतर संबंधित शुल्कांची वसुलीही केली जाणार आहे, अशी माहिती एपीएमसी प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“बाजार समिती क्षेत्रात बिनलायसन्स आणि बिनसेस शेतमाल व्यवहार करणाऱ्यांविरोधात अशीच कठोर भूमिका घेतली जाणार आहे. व्यापाऱ्यांनी कायदेशीर परवाना घेऊनच व्यापार करावा, अन्यथा कारवाई अपरिहार्य आहे.”- डॉ. पी.एल.खंडागळे, सचिव, एपीएमसी