महागाईचा निर्देशांक दिवसेंदिवस वाढत असल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडू लागलेल्या आहेत. या साखळीत आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असणारे शहाळे अर्थात नारळपाणी कमालीचे महागले आहे या शहाळ्याची किंमत विभागानुसार ठरत असून रुग्णालय, उच्चभ्रू लोकवस्ती च्या ठिकाणी हे शहाळे ९० ते १०० रुपये प्रति नगाने विकले जात आहेत तर पॅक बंद डब्यात मिळणारे हे अमृततुल्य पाणी थेट ३०० रुपये प्रति डब्बा आहे हेच नारळपाणी सर्वसामान्य नागरी वसाहतीत ६५ रुपये प्रति नग आहे. थोडीफार किंमतीत घासाघीस केल्यास हा नग ६० रुपयांना मिळत आहे पण दोन तीन वर्षांपूर्वी ३० ते ४० रुपये प्रति नग मिळणारा हे आरोग्यदायी पाणी आता दुप्पट महागले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा ग्लुकोज पण महाग झाला असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबई महापालिकेचा कारवाईचा धाक ….आणी कचरा वर्गीकरणात वाढ

देशाच्या कानाकोपऱ्यात दक्षिण भारतातून निर्यात केले जाणारी शहाळे विक्री आता सर्रास दिसून येते. यापूर्वी काही मोजक्या वर्गाची मक्तेदारी असलेले हे नारळपाणी विक्री अनेकांनी उदरनिर्वाहचे साधन बनवले आहे. तुर्भे येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ बाजारात दक्षिण भारतातील कर्नाटक, केरळ आणि क्वचित प्रमाणात आंध्रप्रदेश, तामिळनाडू या राज्यांतून मोठ्या प्रमाणात शहाळे घाऊक विक्री साठी येतात. हुकमी उत्पन्नाचे साधन असल्याने अलीकडे अनेक शेतकऱ्यांनी नारळाची शेती करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ही आवक वाढली आहे. एपीएमसीच्या घाऊक बाजारात येणारे हे शहाळे नंतर मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात वितरित होते. घाऊक बाजारात हे शहाळे सद्या ५२ रुपये प्रति नग आहे ही किंमत कमी अधिक होऊन ती ४० ते ४५ रुपये पण होत आहे. केरळ कर्नाटक मध्ये हे नारळपाणी २० ते ३० रुपये नगाला पडत आहे.

हेही वाचा >>> उरण नगरपरिषदेने दीड टन निर्माल्यापासून खत व बायोगॅसची केली निर्मिती

वाहतूक खर्च गृहीत धरून ही किंमत घाऊक बाजारात काही प्रमाणात वाढत आहे पण एपीएमसीच्या ४० किलोमीटर परिसरात विकले जाणारे शहाळे थेट दुप्पट दराने विकले जात आहे. आरोग्याशी तडजोड न करणारे नागरिक या चढ्या किंमतीत हे शहाळे विकत घेत आहेत पण सर्वसामान्य नोकरदराच्या खिशाला हे महागडे शहाळे परवडणारे नाही. या शहाळे विक्री करणाऱ्या किरकोळ विक्रत्यांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने नारळपाणी सर्वत्र वेगवेगळ्या किंमतीत विकले जात आहे