नवी मुंबई : २७ वर्षीय तरुण स्टेट बँक ऑफ इंडिया सारख्या बँकेत सहाय्यक व्यवस्थापक असलेल्या युवकांने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना नवी मुंबईतील सी उड्स भागात घडली आहे. सकाळी साडे दहाच्या सुमारास घटना उघडकीस आली असून आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही. या बाबत एन आर आय पोलीस अधिक तपास करीत आहे.

चिन्मय ढेगिया असे आत्महत्या केलेल्या युवकांचे नाव आहे. चिन्मय हे सी उड्स येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत सहाय्यक व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते.. तसेच राहण्यास सेक्टर ४ ८ येथील  साई महाल गृह निर्माण संस्थेत होते.

आज सकाळी ते बँकेत आलेच नाहीत म्हणून बँकेतून त्यांना अनेकदा फोन केला. मात्र फोन बंद येत होता. तसेच त्यांचे जवळच राहणारे एक सहकारी आणि ते अनेकदा एकत्र जातं होते. त्यामुळे त्यांनी घरी जाऊन पाहणी केली असता दरवाजा आतून बंद होता.

दुसरी कडे त्यांच्या गावाहून ही त्यांचे नातेवाईक फोन करत होते त्याही वेळेस फोन बंद लागत होता. त्यांच्या कडे इमारतीच्या सुरक्षा रक्षकाचा फोन असल्याने त्यावर त्यांनी संपर्क केला. त्यामुळे सुरक्षा रक्षक ही चिन्मय यांना पाहण्यासाठी सदनिकेवर गेले. मात्र आतून दरवाजा बंद होता. त्यामुळे शेवटी एनआरआय पोलिसांना कळवण्यात आले.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून किल्ली बनवणाऱ्यास पाचरण करण्यात आले. त्याने लॅचची किल्ली बनवली व लॅच उघडण्यात आले. मात्र आतून कडी लावण्यात आल्याने दरवाजा उघडण्यात मात्र पोलिसांना अपयश आले. शेवटी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता आत फॅनला चिन्मय फाशी घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यांचे शव उतरविण्यात आले आणि पुढील तपासणी साठी वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात पाठवण्यात आले.

एनआरआय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की चिन्मय हे अविवाहित असून एकटेच राहतात. एसबीआय बँकेत सहाय्यक व्यवस्थापक पदावर ते कार्यरत होते. त्यांनी आत्महत्या करण्या  पूर्वी काही लिहून ठेवल्याचे आढळून आलेले नाही. याबाबत चिन्मय यांनी कोणा जवळच्या व्यक्तीला किंवा नातेवाईकांना समाज माध्यमातून  संदेश किंवा लघु संदेश पाठवला आहे का? याची चौकशी सुरु आहे. त्यांच्या आसाम येथे राहणाऱ्या  पालकांना चिन्मय यांच्या आत्महत्ये विषयी माहिती देण्यात आली असून ते नवी मुंबई साठी निघाले आहेत.