उरण : सोमवारी दिवसभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा अटलसेतुलाही फटका बसला आहे. जेएनपीए ते पळस्पे या राष्ट्रीय महामार्गावरील पळस्पे कडून अटलसेतुवर जाणाऱ्या गव्हाण फाटा येथील जे डब्ल्यू आर या गोदामा नजीकच्या मार्गिकेवर प्रचंड पाणी साचले होते. या पाण्यातून वाहने हकाने धोकादायक बनले होते. त्यामुळे अटलसेतुवर जाणारी वाहतूक बंद करण्यात आली होती. परिणामी जे डब्ल्यू आर गोदाम ते पनवेल कलंबोली या टी पॉईंट मार्गा पर्यंत ही वाहतूक कोंडी झाली होती.

या राष्ट्रीय महामार्गावरील पाणी काढण्यासाठी महामार्गाचे दुभाजक तोडण्यात आले आहेत.मुसळधार पावसाने जवळपास तीन हजार कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गाची पोलखोल केली आहे. या मार्गावरील अनेक ठिकाणी गुडगाभर पाणी साचल्याचे चित्र होते.

जेएनपीए ते पळस्पे व जेएनपीए ते आम्र मार्ग असे दोन राष्ट्रीय महामार्ग असून हे दोन्ही महामार्ग अटलसेतुला जोडणारे आहेत. मात्र या मार्गावर दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून खड्डे ही मोठ्या प्रमाणात पडले आहेत. एमएमआरडीए कडून गव्हाण फाटा ते चिर्ले दरम्यानच्या मार्गावर अटलसेतु पर्यंत जाण्यासाठी उड्डाणपूल पुलाची उभारणी केली जात आहे. या उड्डाणपूलाचे काम सुरू आहे.त्यानंतर महामार्गावरील पाण्याचा निचरा झाल्याने पुन्हा एकदा अटलसेतू मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली असल्याची माहिती न्हावा शेवा वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी.बी.मुजावर यांनी दिली आहे.