नवी मुंबई – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव मिळावे, यासाठी गेली तीन वर्षे पनवेल आणि उरण परिसरातील प्रकल्पग्रस्त झटत आहेत. सतत आंदोलन, मोर्चे आणि लोकप्रतिनिधींशी चर्चा करून त्यांनी राज्य तसेच केंद्र सरकारचे लक्ष या मागणीवर वेधले होते. अखेर या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळाल्याचे संकेत मिळत आहेत. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाचे उद्घाटन होत असताना दि. बा. पाटील यांच्या कुटुंबीयांनाही सिडकोकडून अधिकृत निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे या ऐतिहासिक क्षणी त्यांच्या उपस्थितीमुळे वातावरण अधिक भावनिक झाले आहे.दि. बा. पाटील यांचे सुपुत्र आणि प्रकल्पग्रस्तांच्या संघर्षात खांद्याला खांदा लावून उभे राहिलेले अतुल पाटील यांनी लोकसत्ताशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “आजचा दिवस हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण आहे.
दि. बा. पाटील साहेबांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागणार असल्याची बातमी ऐकून हृदय अभिमानाने भरून आले आहे.”नामकरण प्रक्रियेत सुरुवातीला काही अडथळे आले होते, असेही त्यांनी सांगितले. अतुल पाटील म्हणाले, “प्रारंभी या प्रस्तावावर काही तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे निर्णय पुढे ढकलला गेला. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्य मंत्रिमंडळात ठराव मंजूर केला आणि त्यानंतर तो विधानपरिषदेतही पारित झाला. त्यानंतर तो प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला.”केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर हा प्रस्ताव आता अंतिम टप्प्यात पोहोचला असल्याचे अतुल पाटील यांनी स्पष्ट केले.
त्यांनी पुढे सांगितले की, “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी याबाबत चर्चा केली असून, पंतप्रधानांनी या नामकरण प्रस्तावाला पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे. काही तांत्रिक प्रक्रिया सुरू आहेत आणि त्या पूर्ण झाल्यावर अधिकृत घोषणा होईल.”अतुल पाटील यांनी आशा व्यक्त केली की, आजच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान नामकरणाबाबत सकारात्मक संकेत देतील. प्रकल्पग्रस्तांच्या दीर्घकाळाच्या संघर्षाला आता यश मिळण्याच्या उंबरठ्यावर असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.यामुळे प्रकल्पग्रस्तांची विमानतळ नामकरणाबाबत उत्खंठा शिगेला पोहचली असून मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान त्यांच्या भाषणात दि. बा. पाटील यांच्या नावाचा उल्लेख करून प्रकल्पग्रस्तांना दिलास देतील याकडे सा-यांचे लक्ष लागले आहे.