ठाणे-वाशी हार्बर मार्गावर पंधरवडय़ातून सरासरी एकाचा मृत्यू ; सिडकोच्या नियोजनात त्रृटी
ठाणे-वाशी हार्बर मार्गावर ऐरोली नाका, रबाळे, तुर्भे येथील रेल्वे फाटक रहिवाशांसाठी धोकादायक ठरत आहेत. फाटक ओलांडताना पंधरवडय़ातून किमान एका व्यक्तीला तरी प्राण गमवावे लागत आहेत. सिडकोने रेल्वे स्थानके बांधल्यानंतर भुयारी मार्गही बांधणे आवश्यक होते. मात्र तसे न झाल्याने नवी मुंबईतील नागरिकांना धोकादायक रेल्वे क्रॉसिंग करावे लागत आहे. रेल्वे प्रशासनाने रेल्वे रूळ ओलांडू नका, अशा आशयाचे फलक उभारून जबाबदारी झटकली आहे.
ऐरोली नाका, तुर्भे नाका, रबाळे येथील रहिवासी पूर्व आणि पश्चिमेकडे ये-जा करण्यासाठी रेल्वे फाटकांचा वापर करतात. या रेल्वे फाटकांतून जात असताना काही ठिकाणी नेहमीच अपघात होतात. रेल्वे प्रशासनाने ठाणे-वाशी मार्ग सुरू केला आणि सिडकोने नवी मुंबईतील रेल्वे स्थानके बांधली. शहराचा नियोजनबद्ध विकास करताना आवश्यक त्या ठिकाणी पादचारी पूल किंवा भुयारी मार्ग निर्माण करणे आवश्यक असताना सिडकोने मात्र रेल्वेमार्गाच्या परिसरात भुयारी मार्ग उभारण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे ठाणे-वाशी मार्गावर नागरिकांना जीव मुठीत धरून रूळ ओलांडावा लागत आहे. अनेक ठिकाणी शाळकरी मुले ये-जा करतात. या ठिकाणी रेल्वे प्रशासनाने सतर्कता म्हणून गाडी येत असल्याची सूचना देणारे फलक किवा ध्वनिक्षेपक उभारणे गरजेचे होते. मात्र रेल्वे प्रशासनाने देखील सिडकोच्या पावलावर पाऊल ठेवत असे करणे टाळले. या फाटकांच्या परिसरातून जाताना हॉर्न वाजवणे बंधनकारक करावे, अशी सूचना रेल्वे प्रशासनाला देण्यात आली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
एका महिन्यातील मृतांची आकडेवारी
नवी मुंबईतील वाशी रेल्वे पोलीस स्टेशन क्षेत्रातील गोवंडी ते सीवूड्स व रबाले ते वाशी दरम्यान ३१ मार्च २०१७ ते १ एप्रिल २०१६ या कालावधीत ४४ जणांचा मृत्यू झाला तर २६ जण जखमी झाले.
महावितरण वसाहतीतील पादचारी पूल बंद
दहशतवादी हल्ल्यांच्या भीतीचे कारण पुढे करत ऐरोली येथील महावितरण कॉलनी परिसरात रेल्वे रूळ ओलांडण्यासाठी बांधण्यात आलेला पादचारी पूल बंद करण्यात आला आहे. त्यामुळे महावितरण वसाहतीतील नागरिकांना ऐरोली नाक्याला वळसा घालून ये-जा करावी लागत आहे. या पुलावर आता गुर्दुल्ल्यांनी ठाण मांडले आहे. हा पूल पुन्हा सुरू करण्याची मागणी रहिवासी करत आहेत.
ठाणे-बेलापूर मार्गावरील एमआयडीसीमध्ये जाण्यासाठी रबाळे येथे उड्डाणपूल नाही. त्यामुळे पूर्ण वळसा घालून जावे लागते. वेळ नसेल, तर काही वेळा जोखीम पत्करावी लागते.
अर्जुन भोसले, नागरिक
रेल्वेने बांधलेल्या पादचारी पुलांपैकी अनेक ठिकाणी गर्दुल्ले व मद्यपी बसलेले असतात. त्यामुळे नाइलाजास्तव रेल्वे फाटक ओलांडाावे लागते. रेल्वे प्रशासनाने सुरक्षेच्यादृष्टीने देखील लक्ष द्यावे.
पूजा काळे, नागरिक
