नवी मुंबई : सुनियोजित, आधुनिक शहर म्हणून लौकिक मिळवलेल्या नवी मुंबईच्या वेशीवरच खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. ऐरोली टोल नाक्यापासून ते दिवा गाव चौकापर्यंत रस्त्याची झालेली दुर्दशा ही केवळ वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत नाही, तर नवी मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) यांचा हलगर्जीपणाही उघड करते आहे.

ऐरोली खाडी पुलापासून पुढे दिवा गाव चौकापर्यंत वाहनचालकांना खड्ड्यांतून वाट काढावी लागत आहे. यामुळे अपघातांचा धोका वाढला असून, दिवसेंदिवस वाहतूक कोंडी तीव्र होत आहे. खड्डे एवढे खोल आहेत की दोन चाकी वाहनस्वारांचा जीव रोज टांगणीला लागतो, एखाद वेळेस जोरदार पावसात खड्ड्याचा अंदाज न आल्यास त्यात दुचाकीचे चाक रुतून मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘शासन केवळ भरमसाठ टोल आकारते, कर घेते मात्र सर्वसामान्यांना मात्र रस्त्यावर मरायला खड्डे ठेवते’, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांकडून उमटत आहे.

या मार्गावरील जबाबदारीबाबत महापालिका आणि एमएसआरडीसी यांच्यात ढकलाढकली सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. ऐरोली टोल नाका ते खाडी पूल हा भाग एमएसआरडीसीच्या अखत्यारित आहे, तर दिवा गाव परिसर नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत येतो. यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते दिवा गाव पर्यंतचा रस्ता महापालिकेच्या अखत्यारीत येत असला आणि महापालिकेकडून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आल्याचा दावा करण्यात आला असला तरी प्रत्यक्ष परिस्थिती मात्र वेगळीच आहे. या रस्त्यावर महापालिकेकडून काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. परंतु, रस्त्याच्या कडेला पडलेले खड्डे पेव्हर ब्लॉकने बुजवण्यात आल्याने रस्त्याचा समतोल बिघडला आहे. त्यात पावसाळ्यात त्यावरील डांबर उडाल्याने खड्डे अधिक खोल आणि जीवघेणे बनले आहे.

“दररोज कामाला जाताना खड्ड्यांत अडकतो. गाडी चालवणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे झाले आहे. टोल नाक्यावर पैसे मात्र घेतले जातात, पण रस्त्याची देखभाल मात्र कोणी करत नाही,” अशी बोचरी टीका एका वाहनचालकांनी केली आहे. खड्ड्यांमुळे अपघात झाले, लोकांचा जीव गेला तरी जबाबदारी कोणाची? असा प्रश्न उपस्थित करत नागरिकांनी तातडीने हा मार्ग दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. नुकतेच पंतप्रधानानांच्या हस्ते जेएनपीटी येथे देशातील सर्वात मोठ्या कंटेनर टर्मिनलचे उद्घाटन करण्यात आले. परंतु, सध्याची नवी मुंबईतील रस्त्यांची अवस्था पाहता हे कंटेनर वेळेत जेएनपीटी बंदरात पोहोचतील का, याची शाश्वती देता येत नाही. यामुळे भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावरही परिणाम होण्याची शक्यता असून, यात सर्वसामान्य शेतकऱ्यांचेही नुकसान असल्याची भावना तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करा अन्यथा मोठ्या प्रमाणावर आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

ठाणे-बेलापूर मार्गही खड्ड्यात

खड्डे आणि वाहतूक पोलिसांच्या नियोजनाअभावी नवी मुंबईकरांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागतो आहे. मुलुंड–ऐरोली मार्ग, ठाणे–बेलापूर मार्ग तसेच तळवळी व ऐरोलीतील अंतर्गत रस्त्यांवर खड्ड्यांमुळे संध्याकाळी कार्यालये सुटण्याच्या वेळेत प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. गेल्या आठवड्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हजारो नागरिक कोकणात निघाले होते. मात्र खड्डे आणि वाहतूक नियोजनाच्या अभावामुळे त्यांच्या प्रवासालाही मोठा फटका बसला.

नवी मुंबई मनपाच्या अखत्यारितील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम मनपा प्रशासन करत आहे. तसेच ऐरोली खाडी पुलापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक बस थांब्यापर्यंतचा रस्ता हा एमएसआरडीसीच्या अंतर्गत येत असल्याने त्यांना रस्ते दुरुस्तीबाबत पत्र व्यवहार केलेला आहे. तसेच याबाबत आमच्याकडून वारंवार पाठपुरावा देखील सुरू आहे. –संजय पाटील, कार्यकारी अभियंता, ऐरोली