उरण तालुक्यातील खोपटा पाटीलपाडा येथील शिवगौरा उत्सव मंडळाने पाच दिवसांच्या गौरी गणपतीची स्थापना केली असून विसर्जनाच्या निमित्ताने शुक्रवारी बाल्या नृत्याची स्पर्धा घेण्यात आली. सध्याच्या धकाधकीच्या जीवनातही उरण-पनवेलमधील अनेक गावांनी बाल्या नृत्य पथकांची परंपरा कायम ठेवली असून गावांतील तरुणही यामध्ये हिरिरीने सहभागी होतात. यंदा या मंडळाने विविध विषयांवर मार्गदर्शन तसेच बेटी बचावचा संदेश देणारे प्रदर्शनही भरविले आहे.
गणेशोत्सवातील मनोरंजनाचे साधन असलेल्या या नृत्यप्रकारात शीघ्र गीते तयार करून उडत्या चालीवर ढोलकी आणि बुलबुलतरंगच्या साथीने गाणी गायली जातात. नाचामध्ये एकमेकांना गाण्यांच्याच माध्यमातून उत्तरे दिली जातात. त्यावेळी होणाऱ्या जुगलबंदीत एक संघ दुसऱ्या संघाला प्रश्न विचारतो आणि त्याची उत्तरे देणारा संघ अजिंक्य ठरतो, असे या स्पर्धेचे स्वरूप असते. मात्र स्पर्धेपेक्षा मनोरंजन हेच खरे या नाचाचे उद्दिष्ट असते. खोपटे येथे शुक्रवारी याचा प्रत्यय आला. हा नाच पाहण्यासाठी महिलांनीही गर्दी केली होती. समाजातील कालबाह्य़ झालेल्या रूढी, परंपरा यांना छेद देत बुवाबाजी दूर करण्याचे व दुष्काळात शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन यावेळी केल्याची माहिती पदाधिकारी सत्यवान ठाकूर यांनी दिली.