आवक वाढल्यामुळे भावात लक्षणीय घट
समुद्रातील वाढते प्रदूषण आणि वातावरणातील बदलांमुळे मासळीचा दुष्काळ निर्माण झाला आहे. सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यांत राज्य सरकारने पर्सिसीन जाळ्याद्वारे मासेमारी करण्यास परवानगी दिली आहे. या हंगामात बांगडा या माशाने मच्छीमारांना आधार दिला आहे. आवक वाढल्याने किंमत घसरली आहे.
उरणमधील करंजा हे राज्यातील एक मोठे बंदर आहे. या बंदरात ४१५ मच्छीमार बोटी खोल समुद्रात मासेमारी करतात. सातत्याचा मासळीचा दुष्काळ आणि शासनाकडून वारंवार केल्या जाणाऱ्या नियमांच्या जाळ्यात मासेमारीचा व्यवसाय अडकला होता. मच्छीमारांना शासनाकडून देण्यात येणारे अनुदान अनेकदा वेळेत मिळत नाही. तक्रारी करूनही त्यात सुधारणा झालेली नाही. त्यामुळे मच्छीमार त्रस्त आहेत. आठ महिन्यांची मासेमारी सध्या चार महिन्यांवर आली आहे. परराज्यातील मासेमारांचीही संख्या वाढल्याने उरणसह कोकणातील मासेमारीतही घट झाली आहे. याचाही परिणाम मासेमारी व्यवसायावर होत असल्याची माहिती करंजा येथील मच्छीमार आकाश भोईर यांनी दिली.
या वर्षीच्या पर्सिसन नेटने मासेमारीची परवानगी असलेल्या बोटींना सध्या बांगडा मोठय़ा प्रमाणात मिळत आहे. मत्स्यदुष्काळात मासेमारांना बांगडय़ानेच दिलासा मिळाला आहे, मात्र आवक वाढल्याने किलोचे दर १५० वरून ५० रुपये एवढे घसरले आहेत. त्यामुळे मच्छीमारांचे नुकसान होत आहे. तसेच मासळीची प्रतही घटली आहे. तसेच मच्छीमारांच्या प्रगतीसाठी तंत्रज्ञानाचा अभाव हा अडथळा ठरत आहे.
– शिवदास नाखवा, अध्यक्ष, करंजा मच्छीमार सोसायटी