‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’ ला सामोरे जात असताना ‘निश्चय केला – नंबर पहिला’ हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून शहर स्वच्छतेप्रमाणेच सुशोभिकरणाच्या अधिक वेगळ्या संकल्पना राबविण्यावर भर दिला जात आहे. मागील वर्षी साकारलेल्या भित्तीचित्रांची पावसाळ्यासह इतर ऋतुंमुळे झालेली स्थिती लक्षात घेऊन त्यानुसार त्यांची आवश्यक डागडुजी करण्यात येत असून यामध्ये जी भित्तीचित्रे चांगल्या स्थितीत आहेत त्यांना धुवून स्वच्छ, तर ज्या ठिकाणी रंग धुसर वा पुसट झालेले आहे त्याठिकाणी रंगाचे आणखी एक लेपन करण्यात येत आहे. याशिवाय जी चित्रे पाण्यामुळे शेवाळ साचून खराब झालेली आहेत त्या ठिकाणी नवीन रंगसंगतीसह नाविन्यपूर्ण चित्रे रेखाटली जात आहेत.

नवीन चित्रे काढताना त्यामध्ये कला, संस्कृती, विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता अशा विविध बाबींविषयी कोणताही संदेश न लिहिता चित्रांच्या माध्यमातून जनजागृतीपर संदेशाचा प्रसार होईल अशाप्रकारे कल्पक संकल्पना चितारल्या जात आहेत. यावर्षी काही भित्तीचित्रे विविध संतांच्या समाजजागृती करणाऱ्या ओव्या, अभंग व वचनांनी सजणार असून, त्यासोबतच नामवंत साहित्यिकांच्या जीवनाला प्रेरणा देणाऱ्या काव्यपंक्तीही काही ठिकाणी अनुरुप चित्रांसह सुलेखनांकित करण्यात येणार आहेत.

हेही वाचा – नवी मुंबई शहरातील रस्त्याच्या यांत्रिक साफसफाई कामाच्या निविदेला ११ वर्षानंतर मुहूर्त

यंदा नवीन शिल्पाकृती न बसविता मागील वर्षी बसविलेल्या शिल्पाकृतींची आवश्यकतेनुसार डागडुजी केली जात असून, त्या सभोवतालचा परिसर सुशोभित केला जात आहे. अशाचप्रकारे प्रभागांमध्ये ठिकठिकाणी बसविण्यात आलेली कारंजी कार्यान्वित करण्यात येत आहेत. या कारंजांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर न करता अत्याधुनिक सी – टेक मलप्रक्रिया केंद्रातील प्रक्रियाकृत शुद्ध पाण्याचा वापर केला जात असून याव्दारे पिण्याच्या पाण्याची बचत केली जात आहे. नागरिकांमध्ये जलबचतीचा संदेश प्रसारित केला जात आहे. यासोबतच तलावांच्या जलाशयांचे कठडे व सभोवतालच्या जागेच्या सुशोभिकरणावर भर दिला जात आहे.

या वर्षीही जेजे स्कुल ऑफ आर्ट्स, रचना संसद कला महाविद्यालय, रहेजा स्कुल ऑफ आर्टस, अशा नामांकित कला महाविद्यालयांचे विद्यार्थी नाविन्यपूर्ण संकल्पना घेऊन नवी मुंबईचे चित्र बदलण्यासाठी ब्रश हातात घेऊन कामाला लागले असून त्यांच्यासोबत नवी मुंबईतील उत्तम व्यावसायिक चित्रकारही आपले कलात्मक रंग भरत आहेत. साधारणत: ६५० हून अधिक विद्यार्थी व कलावंत चित्रकार नवी मुंबईत ठिकठिकाणी आपले चित्रकलाप्रदर्शन घडवित असून त्यामध्ये १५० हून अधिक विद्यार्थिनी, महिला चित्रकारांचा समावेश आहे.

हेही वाचा – नवी मुंबई बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावणार- आयुक्त मिलिंद भारंबे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या वर्षीचे वेगळेपण म्हणजे मुख्य रस्त्यांप्रमाणेच बॅकलेनच्या स्वच्छता आणि सुशोभिकरणावर विशेष भर दिला जात असून काहीशा दुर्लक्षित असणाऱ्या या बॅकलेन विविधरंगी सजू लागल्याने नागरिकांकडून या वेगळ्या कामाची प्रशंसा केली जात आहे. अशाच प्रकारे एमआयडीसी क्षेत्रातील स्वच्छतेकडे लक्ष दिले जात असून याठिकाणी भित्तीचित्रांव्दारे, तसेच परिसर सुशोभिकरणाव्दारे त्या क्षेत्राला दर्शनी आकर्षक बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सोबतच झोपडपट्टी व गावठाण भागातही सुशोभिकरण करून तेथील चित्र बदलले जात आहे.