महापौर बंगल्याच्या वाटेवर झोपडीदादांचे अतिक्रमण

घराच्या शोधात असलेल्या गरजूंच्या अगतिकतेचा फायदा घेऊन नवी मुंबईत झोपडीदादा गब्बर होत आहेत. बेलापूरमधील पारसिक हिल येथे असलेल्या महापौर बंगल्याच्या परिसरात पंचशीलनगरातील जमीन झोपडीदादांनी बळकावली आहे. तिथे एक झोपडी उभारण्यासाठी ३० हजार रुपये घेतले जात आहेत. मजूर वर्गातील व्यक्ती या झोपडय़ांसाठी आपली पुंजी खर्च करत असून त्यात त्यांची फसवणूक होत आहे.

नवी मुंबई शहरात मोकळे भूखंड, रेल्वे स्थानकांच्या परिसरातील मोकळ्या जागा व जिथे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे अशा ठिकाणी बेकायदा झोपडय़ा बांधून राहणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. विविध रेल्वे स्थानकांच्या बाजूला मोकळ्या जागांवर भंगारची गोदामे उभारण्यात आली आहेत. बेलापूर रेल्वे स्थानकातून शहाबाज, बेलापूर गावाकडे जाताना असलेल्या पारसिक हिलच्या दिशेने दोन्ही बाजूंना बेकायदा झोपडय़ा बांधल्या जात आहेत. सुरुवातीला काही लहान-मोठी झाडे तोडून या डोंगराचा काही भाग मोकळा केला गेला. त्यानंतर तिथे ताडपत्रींचे किंवा प्लास्टिकचे शेड उभारून जागा अडवली जाते. त्यानंतर हळूहळू पत्र्याची शेड बांधली जाते. काही महिन्यांनंतर पक्की झोपडी बांधण्यात येते. पंचशील नगराच्या बाजूला अनेक बेकायदा झोपडय़ा आहेत. काही १९९५ पूर्वीच्या असल्याचे तेथील झोपडीधारक सांगतात. परंतु आता तिथे गोवंडी, मानखुर्द, तुर्भे, मुंबईतील हातावर पोट असणाऱ्यांची वस्ती वसवली जाऊ लागली आहे. या मजुरांना डोंगरातील जागा दाखवली जाते. आम्हाला ३० हजार रुपये द्या आणि इथे बिनधास्त झोपडी उभारा, असे सांगून पैसे उकळले जात आहेत. डोक्यावर कायमस्वरूपी छत असावे म्हणून पै-पै जोडून जमा केलेली रक्कम हे मजूर झोपडीदादांना देत आहेत. या झोपडय़ांची गर्दी आता पारसिक हिलच्या दिशेने सरकू लागली आहे. पालिकेचे मात्र याकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे.

याच डोंगरातून हार्बर रेल्वे मार्ग जातो. सध्या एका बोगद्यातील वाहतूक दुसऱ्या बोगद्यात वळवण्यात आली आहे. या बोगद्याकडे जाणारा रेल्वेमार्ग झोपडय़ांपासून जवळ आहे. या झोपडपट्टीवासीयांची घराबाहेर खेळणारी लहान मुले गंमत म्हणून छोटे दगड रेल्वेच्या दिशेने भिरकावताना दिसतात. काही वर्षांपूर्वी अशाच प्रकारे भिरकावलेला दगड लागून एका रेल्वे प्रवाशाच्या डोक्याला मोठी दुखापत झाली होती. आता या झोपडय़ा महापौर बंगल्याच्या दिशेने वाढू लागल्या आहेत. या झोपडय़ांवर कारवाई करत झोपडीदादांचा हा फसवणुकीचा धंदा पालिका व पोलिसांनी बंद करावा, अशी मागणी येथील रहिवासी करत आहेत.

असा होतो गैरव्यवहार..

  • गोवंडी, चेंबूर परिसरातील मजुरांना येथे झोपडी बांधण्यासाठी जागा मिळत असल्याचे सांगून बेलापूरला आणले जाते. दोघेजण त्यांना डोंगरउतारावरची जागा दाखवतात. ३० हजार रुपये घेतात आणि तुम्हीच झोपडी बांधा असे सांगितले जाते.
  • या परिसरात पाण्याची सोय खाली रस्त्यालगत आहे. डोंगरउतारावरून उतरून शौचास जावे लागते. काही जण डोंगरावरच मोकळ्या जागेत प्रातर्वधिी करतात.
  • कोणी कारवाईसाठी आले तर आमची जबाबदारी नाही, असे सांगूनच पैसे घेण्यात आल्याचे एका झोपडीधारकाने सांगितले. आसरा मिळेल, म्हणून आम्ही ३० हजार रुपये दिले असेही तो म्हणाला.

तुर्भे येथेही धंदा तेजीत

तुर्भे येथील इंदिरानगर परिसरात बंद पडलेल्या कंपन्यांच्या जागा बँकांनी सील केल्या आहेत. झोपडीदादा तिथे झोपडय़ा बांधणाऱ्यांकडून महिन्याचे भाडे घेत आहेत. पालिकेने योग्य कारवाई करून हे गैरप्रकार बंद पाडले पाहिजेत.

महेश कोठीवाले, तुर्भे

बेलापूर येथील पारसिक हिलच्या उतारावर बेकायदा झोपडय़ांवर कारवाई करण्यात येईल. तसेच जागा अडवून जर कोणी पैसे मागत असेल तर त्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील.

शशिकांत तांडेल, विभाग अधिकारी, बेलापूर