कांदा-बटाटा, लसूण बाजारातील नऊ गाळे खुल्या बाजारात विक्रीस
नवी मुंबई : नवीन कृषी कायद्यामुळे राज्यातील घाऊक बाजार समितींच्या बाहेर होणारा व्यापार वाढणार असल्याने कर्ज काढून विकत घेतलेले गाळे नाममात्र राहणार असल्याने ते विकून टाकण्याचा प्रयत्न अनेक व्यापाऱ्यांनी सुरू केला आहे. कांदा-बटाटा, लसूण बाजारातील नऊ गाळे खुल्या बाजारात विक्रीस आहेत. व्यापाऱ्यांच्या बरोबरीने शेतकरीदेखील खुल्या बाजारात व्यापार करू शकणार असेल तर कोट्यवधी किमतीचे गाळे विकून गावी गेलेले बरे या मतापर्यंत व्यापारी आलेले आहेत.
मुंबईत अनेक ठिकाणी विखुरलेले घाऊक बाजार एकाच ठिकाणी आणण्यासाठी राज्य सरकारने नव्वदच्या दशकात प्रयत्न सुरू केले. या बाजारपेठा एकाच छताखाली मुबंईबाहेर हलविणे आवश्यक होते. त्यासाठी १९७८ मध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना करण्यात आली. त्यांच्या माध्यमातून सिडकोकडून जमीन घेऊन आशिया खंडातील मोठी घाऊक बाजारपेठ तुर्भे सेक्टर १९ येथे उभारण्यात आली असून कांदा, बटाटा, लसूण, फळ, भाजी, धान्य आणि मसाला अशा पाच घाऊक बाजारांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. यासाठी चार हजार ३०० व्यापारी गाळे बांधण्यात आले असून सर्वाधिक गाळे हे फळ बाजारात एक हजार ५० आहेत. राज्य सरकारने एपीएमसीची स्थापना केल्यानंतर शेतकऱ्यांनी आपला शेतमाल या स्थानिक घाऊक बाजार समितीत आणून व्यापाऱ्यांना विकावा आणि व्यापाऱ्यांनी तो शेतमाल किरकोळ खरेदीदारांना विकून शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा अशी ही यंत्रणा गेली तीस-चाळीस वर्षे सुरू आहे. मुबंईत घाऊक व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांनी नवी मुंबईत समितीकडून व्यापारी गाळे विकत घेतले आहेत. त्यासाठी बँका व पतसंस्थांकडून कर्ज घेण्यात आलेले आहे. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे पैसे बुडवू नयेत यासाठी हे गाळे अप्रत्यक्ष समितीकडे गहाण ठेवण्यात आले आहेत. व्यापारी गाळे विकत घेऊन व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांना समितीचे कर, माथाडी कायदे, परवाने यांची सर्व पूर्तता करावी लागत आहे. नवीन कृषी कायद्यामुळे कोणताही शेतकरी बाजार समितीच्या बाहरे कुठेही जाऊन शेतमाल विकू शकणार आहे. त्यामुळे कर्जाचे ओझे घेऊन व्यापार करण्यापेक्षा मुळात शेतकरी असलेला व्यापारी बाजार समितीच्या बाहेर व्यापार करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे आजच्या घडीला काही लाखांत घेतलेले व्यापारी गाळे आता कोट्यवधींच्या घरात गेल्याने ते विकून गावी जादा शेती विकत घेण्याचा विचार व्यापाऱ्यांनी केला आहे.
कांदा-बटाटा बाजारात नऊ गाळे विक्रीसाठी आहेत. भाजी बाजारातही आठ गाळे विक्रीला काढण्यात आले आहेत. फळ बाजारात व्यवसाय अर्ध्यावर आला असून यापूर्वी येणाऱ्या तीनशे गाड्या आता दोनशेपर्यंत येत आहेत. व्यापारी चिंताग्रस्त असल्याने पर्याय शोधत आहेत. – संजय पानसरे, संचालक