पनवेल महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने ७८ पैकी २६ उमेदवारांची पहिली यादी सोमवारी जाहीर केली. रिपाइंला सोबत घेऊन भाजप निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. भाजपचे आमदार व रायगड जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी पहिली यादी जाहीर केली.
भाजपच्या यादीमध्ये प्रभाग १९ मध्ये आमदार बंधू परेश ठाकूर यांच्यासह चंद्रकांत सोनी यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून आमदारांचे मामा अनिल भगत यांच्या नावाची जी चर्चा सुरू होती, तिला पूर्णविराम मिळाला. याच प्रभागामध्ये २ जागा सर्वसाधारण महिलांसाठी आहेत. भाजपने उच्चशिक्षित उमेदवार देण्याचे धोरण आखून प्रभाग १३, १६, १७ मधून अनुक्रमे डॉ. अरुण भगत, डॉ. कविता चौतमल व अॅड. मनोज भुजबळ यांना उमेदवारी दिली आहे. प्रभाग ५ मधून खारघर फोरमच्या लीना गरड यांना संधी देण्यात आली आहे. गरड यांनी यापूर्वी खारघर ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली आहे. गरड यांच्याकडील कथित संपत्तीविषयी त्यावेळी शेकाप नेते जयंत पाटील यांची खारघरमधील सभेत टीका केली होती. प्रभाग क्रमांक १२ मधून रिपाइंचे रायगड जिल्हा अध्यक्ष जगदीश गायकवाड यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. गायकवाड यांच्या पत्नी कविता यांना यापूर्वी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा बहुमान शेकापने मिळवून दिला होता. शेकापसोबत बिनसल्याने त्यांनी शेकापला सोडचिठ्ठी देऊन भाजपसोबत हातमिळवणी केली.
भाजपने पहिल्या यादीमध्ये माजी नगरसेवकांना संधी दिली असून प्रभाग क्रमांक १५ मधूून एकनाथ गायकवाड, प्रभाग १६ मधून समीर ठाकूर आणि प्रभाग क्रमांक १७मधून प्रकाश बिनेदार यांना संधी दिली आहे. माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे समर्थक संतोष शेट्टी यांची वर्णी पहिल्याच यादीमध्ये प्रभाग क्रमांक १६ मध्ये लागली आहे. याशिवाय तळोजा येथील घोट गावातील माजी सरपंच विनोद पाटील यांना प्रभाग १ मधून तसेच पेणधर गावातील संतोष भोईर यांच्यासह खुटारी गावातील नंदकुमार म्हात्रे यांच्या पत्नी लीना यांचे नाव याच प्रभागामधून जाहीर केले आहे. प्रभाग २ मधून राम पाटील, दिनेश खानावकर यांना संधी दिली आहे. प्रभाग ३मध्ये मुस्लीम समाजाला आपलेसे करण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. साजीद पटेल यांना उमेदवारी दिली असून याच प्रभागामधून प्रतीक्षा प्रल्हाद केणी यांचे नाव जाहीर केले आहे. प्रभाग ५ मध्ये शेकापला सोडचिठ्ठी देऊन भाजपप्रवेश केलेल्या विजय पाटील यांच्या पत्नी वनिता यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रभाग नऊ मधून संगीता कांडपाळ, प्रभाग ११ मधून गोपीनाथ भगत, संतोषी तुपे तसेच प्रभाग १२ मधून दिलीप पाटील व कुसुम म्हात्रे यांची नावे भाजपने जाहीर केली आहेत. प्रभाग क्रमांक १३ मधून विकास घरत व १६ मधून राजेश्री वावेकर यांना संधी दिली आहे. भाजपने अद्याप ७८ पैकी ५२ उमेदवारांची नावे जाहीर करणे शिल्लक ठेवले असून पहिल्या यादीमध्ये ९ महिलांना संधी दिली आहे.
फूट टाळण्यासाठी यादीची गुप्तता..
भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केल्यामुळे शेकाप महाआघाडी समोर उमेदवारी जाहीर करण्याचे आव्हान उभे राहिले आहे. शेकाप व काँग्रेसमध्ये जागावाटपावरून अद्याप एकमत न झाल्यामुळे महाआघाडीत बिघाडी होते का याकडे भाजपचे नेते लक्ष देऊन आहेत. सर्व राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केल्यानंतर इच्छुकांची नाराजी चव्हाटय़ावर येईल. तसेच काही नाराजअंतर्गत कुरघोडय़ांचे राजकारण सुरू करतील, अशी दाट शक्यता आहे.