प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्याकडून चाचपणी; राज्यस्तरीय परिषदेची व्यूहरचना
नवी मुंबई : भाजपाची या आठवडय़ात होणारी राज्यस्तरीय परिषद ही नवी मुंबई पालिकेच्या निवडणुकीची मोर्चेबांधणी ठरणार असल्याचे मानले जात आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी मंगळवारी नवी मुंबईतील भाजपाचे नेत्यांच्या वैयक्तिक बैठका घेऊन परिषदेच्या तयारीची चाचपणी केली तर भाजपाची मातृसंस्था असलेल्या संघाचे संघटनमंत्री विजय पुराणिक यांनी भाजपाचे येथील आमदार गणेश नाईक, मंदा म्हात्रे, रमेश पाटील आणि डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांची एक संयुक्त बैठक घेऊन परिषदेची व्यूहरचना ठरविण्यात आली आहे.
या परिषदेला राज्यातील २५० पदाधिकारी नवी मुंबईत दोन दिवस तळ ठोकणार असून त्यानंतर नवी मुंबई पालिकेचा गढ जिंकण्यासाठी तयारी करणार आहेत.
नवी मुंबई पालिकेची एप्रिलच्या दुसऱ्या आठवडय़ात निवडणूक होण्याची शक्यता आहे. गणेश नाईक यांच्या भाजपा प्रवेशानंतर नवी मुंबई पालिका भाजपाच्या अलगद ताब्यात गेलेली आहे. ती परत आपल्या ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी कंबर कसली असून शिवसेना, काँग्रेसबरोबर महाविकास आघाडी केली आहे. या तीन पमुख पक्षांच्या कार्यकर्त्यांचा एक मनोमिलन मेळावा नुकताच वाशी येथील विष्णुदास भावे नाटय़गृहात झाला. त्यावेळी या पक्षांच्या नेत्यांनी नाईकांना पालिकेच्या सत्तेपासून बाहेर ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. महाविकास आघाडीच्या प्रचाराची पहिली फेरी आचारसंहिता लागण्यापूर्वी पूर्ण झालेली आहे.
त्याला जशास तसे उत्तर देण्यासाठी भाजप व भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही तयारी सुरू केली आहे. येत्या १५ व १६ फेब्रुवारी रोजी भाजपाचे राज्यस्तरीय परिषद करावे येथे होत आहे. त्यासाठी राज्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी नवी मुंबईत येणार असून पक्षबांधणी व पुढील दिशा ठरवली जाणार आहे. त्यासाठी सर्वप्रथम मिशन नवी मुंबई हाती घेण्यात आले असून राज्यातील पदाधिकाऱ्यांना नवी मुंबईतील १११ प्रभागांची जबाबदारी दिली जाणार आहे. मतदानाच्या एक माहिना अगोदर हे पदाधिकारी प्रत्येक प्रभागात जाऊन मोदी, फडणवीस सरकार आणि नाईक यांचे नवी मुंबईतील योगदान याबद्दल माहिती देणार आहेत. एका प्रभागासाठी दोन प्रचारक नेमले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या प्रचाराला जशास तसे उत्तर देण्याची तयारी भाजपाने केली आहे.
नाईक-म्हात्रे मनोमीलनासाठी प्रयत्न
नवी मुंबई भाजपामधील विळ्या-भोपळयाचे वैर असलेले गणेश नाईक व मंदा म्हात्रे यांचे या निवडणुकीनिमित्ताने मनोमीलन व्हावे यासाठी चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी नवी मुंबईत ठाण मांडले होते. त्यांनी या दोन नेत्यां बरोबरच वैयक्तिक बैठका घेऊन नवी मुंबईच्या राजकीय परस्थितीचा अंदाज घेतला. याबरोबरच नवी मुंबई अध्यक्ष रामचंद्र घरत यांचीही भेट घेतली.
आघाडीच्या मेळाव्याला उत्तर
परिषदेसाठी राज्यातील २५० पेक्षा जास्त पदाधिकारी येणार आहेत. नवी मुंबईतील पालिका निवडणुकीचे सर्वाधिकार गणेश नाईक यांना देण्यात आले असल्याचे कळते. परिषदेची तयारी माजी आमदार संदीप नाईक व माजी महापौर सागर नाईक, युवा नेते चेतन पाटील करीत आहेत. महाविकास आघाडीच्या मेळाव्याला भाजपा या परिषदेने उत्तर देणार आहे.