नवी मुंबई : वाशी, सीवूड्स येथे सध्या सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांच्या कामांमुळे हवाप्रदूषण आणि वाहतूक कोंडीचा त्रास वाढू लागला असतानाच येथील काही प्रकल्पांमध्ये इमारतीचा पाया खणण्यासाठी करण्यात येणारे नियंत्रित स्फोटांमुळे आसपासच्या इमारतींना हादरे बसू लागले आहेत. विशेष म्हणजे, निवासी भागांत कोणत्याही प्रकारच्या खोदकामासाठी स्फोट करण्यास कायदेशीर परवानगी नसतानाही हे प्रकार सर्रास सुरू असून महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ, महसूल विभाग, पोलीस या साऱ्यांनीच याबाबत कानावर हात ठेवले आहेत.

गेल्या काही वर्षांपासून प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवून नवी मुंबईत पुनर्विकास प्रकल्प तसेच नवीन बांधकाम प्रकल्प राबवण्यात येत आहेत. या प्रकल्पांना राजकीय आश्रय असल्यामुळे शासकीय यंत्रणा त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारींकडे पाहायलाही पोलीस किंवा महापालिका तयार नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा – मिरजेतील उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यावर काँग्रेसचा बहिष्कार

वाशी सेक्टर २ येथील मेघदूत, मेघराज या जुन्या चित्रपटगृहाच्या ठिकाणी सध्या मोठा मॉल उभारणीचे काम सुरू आहे. या मॉलच्या तळघराच्या कामासाठी खोलवर पाया खणण्यात येत आहे. मात्र, अनेक ठिकाणी मुरूम खडक लागत असल्यामुळे नियंत्रित स्फोट घडवून तो खडक फोडण्यात येत आहे. याठिकाणी बांधकाम उभारणीचे काम नवी मुंबईतील एका मोठ्या राजकीय नेत्याला मिळाले आहे. या नेत्यांच्या कंपनीकडून दिवसा-रात्री कधीही स्फोट केले जातात. लगतच असलेल्या रेल्वे कॉलनी, एस.एस. टाईप तसेच सिडकोच्या जुन्या संकुलातील रहिवाशी या हादऱ्यांमुळे जीव मुठीत घेऊन रहात आहेत. यापैकी अनेकांनी पोलीस, महापालिकेकडे तक्रारी केल्या. मात्र या तक्रारींची दखल घेण्यात आलेली नाही. वाशी सेक्टर नऊ येथील बहुसंख्य इमारती पुनर्विकासासाठी रिकाम्या करण्यात आल्या आहेत. असे असले तरी जेएन ३, ४ अशा काही मोठ्या संकुलांमधील रहिवाशी अजूनही पुनर्विकासाच्या प्रक्रियेत नाहीत. स्फोटांच्या हादऱ्यांमुळे आपल्या आधीच जीर्ण इमारती आणखी धोकादायक होतील, अशी भीती या रहिवाशांना वाटत आहे. त्याचप्रमाणे सीवूड्स येथील सेक्टर ४६ अ भागात पामबीच मार्गालगत एका मोठ्या गृहसंकुलाच्या उभारणीचे काम सुरू आहे. या ठिकाणी खोलवर पाया खोदण्यासाठी गेल्या तीन-चार महिन्यांपासून दररोज स्फोट घडवण्यात येत आहेत. ‘नियंत्रित’ पद्धतीने घडवण्यात येणाऱ्या या स्फोटांचा आवाज मोठा नसला तरी, जमिनीखाली होणाऱ्या स्फोटाच्या कंपनलहरींमुळे सेक्टर ४६, सेक्टर ४६ अ, सेक्टर ५० या परिसरातील इमारतींना हादरे बसत आहेत. या परिसरात सिडकोच्या २० वर्षांहून अधिक जुन्या इमारती असून त्यांचे या हादऱ्यांमुळे नुकसान होत आहे.

महापालिकेचा पर्यावरण विभाग कागदावरच

महापालिकेच्या पर्यावरण विभागाने मध्यंतरी यापैकी काही बांधकाम ठिकाणांना भेटी देऊन प्रदूषण नियंत्रणाचे नियम पाळले जात नसल्याबद्दल नोटीसा बजावल्या होत्या. अगदी काही हजारांमध्ये दंडही आकारण्यात आला होता. मात्र प्रदूषणासंबंधी ओरड कमी होताच पुन्हा याठिकाणी आखून देण्यात आलेले नियम मोडले जात आहेत. याकडे पर्यावरण विभाग लक्ष देत नसल्याच्या तक्रारी आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला तर याविषयी घेणेदेणे नसल्याचे चित्र आहे.

हेही वाचा – साताऱ्यात उदयनराजे यांना महायुतीतूनच विरोध

नेत्यांना काम, रहिवाशांना घाम

वाशीतील सिडको इमारतींच्या पुनर्विकासाची कामे ठरावीक नेत्यांच्या पाठबळाने सुरू आहेत. इमारती पाडणे, खोदकामे, राडारोडा वाहतूक, भंगारविक्रची कामे काही स्थानिक नेत्यांनीच मिळवली आहेत. त्यामुळे राजरोसपणे होत असलेल्या कायदेशीर उल्लंघनाकडे ते काणाडोळा करत आहेत. तक्रारींना पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणाही जुमानत नसल्याचे चित्र आहे.

सीवूड्स येथील गृहसंकुलासाठी करण्यात येणाऱ्या स्फोटांमुळे आसपासच्या सिडको इमारतींना धक्के बसत आहेत. एक दोन इमारतींचे प्लास्टर कोसळण्याच्या घटनाही घडल्या आहेत. याबाबत वारंवार तक्रारी करूनही त्याकडे प्रशासकीय यंत्रणा दुर्लक्ष करत आहेत. – दत्ता घंगाळे, भाजप पदाधिकारी

वाहनतळाचा नियम मुळाशी?

राज्य सरकारच्या नव्या विकास नियमावलीत चटईक्षेत्राची मुक्त हस्ते उधळण करत असताना वाहनतळासाठी अतिरिक्त जागा काढण्याचे बंधन आहे. नवी मुंबईत काही ठिकाणी इमारतींच्या उंचीवर बंधने असल्याने बिल्डरांकडून वाहनतळाची सोय करण्यासाठी दोन-तीन मजल्यांची तळघरे उभारली जात आहेत. त्यामुळे जमिनीशी मुरूम लागूनही आणखी खोल पाया खणण्यासाठी स्फोट घडवण्यात येत आहेत, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

वाशी सेक्टर २ येथे सुरू असलेल्या मॉल उभारणीसाठी होत असलेल्या स्फोटांच्या तक्रारी आम्ही वारंवार यंत्रणांकडे केल्या आहेत. घरांना हादरे बसत आहेत, काही घरांना तडे गेले आहेत. अगदी २०० ते ३०० मीटर अंतरावर असलेल्या घरांनाही या स्फोटांमुळे हादरे बसतात. पोलीस आणि महापालिकेला मात्र हे हादरे ऐकू येत नाहीत. – जितेंद्र कांबळे, अध्यक्ष वाशीनगर सेक्टर २ असोसिएशन

हेही वाचा – अशोक चव्हाण – डॉ. माधव किन्हाळकर तब्बल २५ वर्षांनंतर एकत्र!

पुनर्विकास प्रकल्पात मोठे बिल्डर आणि राजकीय नेते सहभागी आहेत. आम्ही कुणाकडे तक्रारी नोंदविल्या तर लगेच नेत्यांचे प्रतिनिधी आमच्याकडे येतात. सतत तक्रारी करूनही कुणीही दखल घेत नाही हा अनुभव आहे. त्यामुळे तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करण्याशिवाय पर्याय नाही. – समित चौगुले, स्थानिक नागरिक, सेक्टर ९

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नियम पायदळी

खोदकाम करताना स्फोट घडवण्यात येतात. त्यामध्ये सुरूंग स्फोटाखेरीज जिलेटिन कांड्यांचा वापर करून नियंत्रित स्फोटांचा पर्याय उपलब्ध असतो. याअंतर्गत जमिनीखाली स्फोट घडवताना काळजी घेतली जाते. स्फोटांचा भूपृष्ठावरील परिणाम रोखण्यात येतो. एका मर्यादेच्या पलीकडे स्फोट होत राहिल्यास त्याचा थेट फटका आसपासच्या इमारतींच्या सरंचनेला बसू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.