मोरा बंदरातून सेवा मिळणार असल्याची मेरिटाइम बोर्डाची माहिती

उरण ते घारापुरी जलसेवा मार्चपर्यंत सुरू होणार असून त्यासाठी प्रौढांना १२० रुपये आणि बालकांना ८० रुपये एवढे परतीचे तिकीटदर आकारण्यात येणार आहेत. जलसेवेमुळे हे अंतर अवघ्या अध्र्या तासात पार करता येणार आहे. महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडून ही माहिती देण्यात आली

जागतिक ठेवा म्हणून घारापुरी (एलिफंटा) बेटावरील काळ्या पाषाणातील कोरीव शिव लेणी जगप्रसिद्ध आहेत. ही लेणी पाहण्यासाठी मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथून लाँचने प्रवास करावा लागतो. उरणपासून अतिशय जवळ असूनही उरणवासीयांना हा द्राविडी प्राणायाम करावा लागत असे. पर्यटकांचा आणि स्थानिकांचा वेळ वाचावा म्हणून महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डने उरण ते घारापुरी जलसेवा सुरू करण्याची परवानगी दिली आहे.

उरण तालुक्याचाच एक भाग असलेल्या घारापुरी बेटावर एकूण तीन गावे आहेत. येथील ग्रामस्थांना तसेच विद्यार्थ्यांना आपली नित्याची खरेदी करण्यासाठी मुंबईत यावे लागते. तर गावात दहावीनंतरच्या शिक्षणाची तसेच विजेची सोय नसल्याने निम्म्यापेक्षा अधिक ग्रामस्थ अनेक सेवा-सुविधांसाठी उरणवर विसंबून आहेत. नवी मुंबई व रायगडच्या पर्यटकांना घारापुरी बेटावर जाण्यासाठी मुंबई गाठावी लागत होती. त्यामुळे मोरा बंदरातून जलसेवा सुरू करण्याची मागणी होती. याची दखल घेत घारापुरी ते मोरा ही जलसेवा सुरू करण्यास परवानगी दिल्याची माहिती मोरा बंदर अधिकारी अरविंद सोनावणे यांनी दिली. ही सेवा महेश टूर्स ही कंपनी देणार आहे. तसेच जलसेवेची सुरुवात २५ मार्चपर्यंत करण्यात येणार आहे. या जलसेवेमुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल आणि उरण व घारापुरीतील रहिवाशांना त्याचा मोठा फायदा होईल, असा विश्वासही सोनावणे यांनी व्यक्त केला.